पुणे : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चतु:शृंगी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी पूर्णत्वास जात आहे. ३ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्रोत्सवाची घटस्थापान होत असून येत्या रविवारपासून (२९ सप्टेंबर) मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे.

श्री चतु:शृंगी देवस्थान ट्रस्टतर्फे चतु:शृंगी देवी मंदिराच्या जीर्णद्धाराचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. भाविकांना दर्शनासाठी मंदिर १७ सप्टेंबरपासून खुले करण्याचे नियोजन होते. परंतु, जीर्णद्धाराच्या कामात काही अडचणी आल्या असून काम पूर्णत्वास जाण्यास उशीर होत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून आता रविवारपासून (२९ सप्टेंबर) मंदिर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार असल्याची माहिती, ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त श्रीकांत अनगळ यांनी दिली. त्यामुळे नवरात्रोत्सवात भाविकांना देवीच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे.

हे ही वाचा…पिंपरी- चिंचवड: भोसरी मतदारसंघ तुतारीला? शिवसेना ठाकरे गटाने घेतला हा मोठा निर्णय

नवरात्रोत्सवाच्या काळात या वर्षीपासून श्रीसुक्त पठणाचा उपक्रम नव्याने सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला आणि पुरुषांच्या गटाने देवस्थानच्या कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळात संपर्क साधण्याचे आवाहन अनगळ यांनी केले.