पुण्यातील रुपी बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर रिझर्व बँकेने र्निबध आणल्यामुळे खातेदार आणि ठेवीदारांमध्ये शनिवारी एकच खळबळ उडाली. बँकेच्या खातेदाराला सहा महिन्यात एक हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही असे र्निबध आल्यामुळे बँकेशी संबंधित सर्व घटकांमध्ये फार मोठी अस्वस्थता पसरली आहे. थकीत कर्जाची अपेक्षित वसुली न झाल्यामुळे ही कारवाई बँकेवर झाली आहे.
बँकेला लागू केलेले र्निबध त्वरित अमलात आणण्याबाबत रिझर्व बँकेकडून कळवण्यात आल्यामुळे शनिवारी सकाळी साडेदहापासूनच बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर र्निबध लागू झाले. रिझर्व बँकेचे अधिकारी सकाळी बँकेच्या मुख्य कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी कारवाईचे पत्र बँकेला दिले. बँकिंग नियंत्रण कायद्याच्या कलम ३५ अ अनुसार (अपेक्षित कर्ज वसुली नाही) ही कारवाई करण्यात आली आहे. खातेदारांना पुढील सहा महिन्यांत एकदाच एक हजार रुपये खात्यातून काढता येतील, तसेच कोणत्याही ठेवी ठेवता येणार नाहीत आणि बचत खाते वा चालू खात्यात रक्कम भरता येणार नाही, असे र्निबध घालण्यात आले आहेत. त्यामुळे बँकेला यापुढे फक्त कर्जवसुलीची प्रक्रिया सुरू ठेवता येईल. बँकेवर यापूर्वीही अशाच प्रकारची कारवाई सन २००२ मध्ये करण्यात आली होती.  
कारवाईची बातमी पुण्यात पसरताच बँकेच्या मुख्य कार्यालयासह सर्व शाखांच्या बाहेर खातेदारांच्या रांगा लागल्या. आर्थिक व्यवहारांना प्रतिबंध करण्यात आल्यामुळे चिंतित झालेले खातेदार तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत होते. बँकेच्या काही संचालकांमुळेच ही वेळ बँकेवर आली, असा आरोप केला जात असून संचालकांची मनमानी हेच कारवाईचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
आर्थिक स्थिती चांगली – अध्यक्ष
दरम्यान, बँक आर्थिक संकटातून जात असली, तरी ठेवीदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष प्यारेलाल चौधरी यांनी केले आहे. संचालक मंडळ गेल्या चार वर्षांपासून काम करत असून चार वर्षांत २५५ कोटींची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. बँकेकडे असलेल्या ठेवी व खात्यांमधील पैसे कुठेही जाणार नाहीत. बँकेची आर्थिक स्थिती चांगली आहे, असाही दावा त्यांनी केला.
सध्याच्या संचालक मंडळातील काही ज्येष्ठ संचालकांच्या मनमानी कारभारामुळे हा प्रसंग ओढवला आहे. रिझर्व बँकेने केलेली कारवाई ही ठेवीदार व खातेदारांसाठी दु:खदायक गोष्ट असून प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या प्रयत्नांवर या कारवाईमुळे घाला आला आहे, अशी प्रतिक्रिया रुपी बँक खातेदार संघटनेने व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– बँकेवर दृष्टिक्षेप:- महाराष्ट्रात ३५ शाखा, तीन विस्तारित कक्ष, ५५ हजार सभासद, सात लाख खातेदार व ठेवीदार
– आर्थिक आघाडीवर:- ठेवी १,४०० कोटी, कर्जे ७०० कोटी, निव्वळ एनपीएचे प्रमाण २.७५ टक्के, सरकारी रोख्यांमध्ये ५०० कोटींची गुंतवणूक, इतर बँकांमधील ठेवी ७० कोटी, थकीत कर्जे ३६० कोटी
– कारवाई कशासाठी:- रिझर्व बँकेचे आदेश डावलून कर्ज वाटप, कर्ज थकबाकीच्या वसुलीत अपयश
– बँकेचा दावा:- बँकेला शंभर वर्षांची परंपरा आहे. बँक आर्थिक संकटातून जात असली, तरी सांपत्तिक स्थिती लक्षात घेऊन ठेवीदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. बँकेवर काही कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बंधने आली आहेत. संचालक मंडळ बरखास्त झालेले नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restrictions on financial transactions on rupee bank by reserve bank
Show comments