पुणे : गणेशोत्सव काळात पुण्यात मद्यविक्रीवर निर्बंध असणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शुक्रवारी प्रसृत केले. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शनिवारी (७ सप्टेंबर) गणेश आगमनाच्या दिवशी आणि १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मद्यविक्री बंद असणार आहे.

गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १८ सप्टेंबर रोजी पुणे शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावरील मद्यविक्रीची दुकाने, मद्यालये ही विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी (११ आणि १३ सप्टेंबर) गणेश विसर्जन होणाऱ्या परिसरातील मिरवणूक मार्गावरील सर्व मद्यविक्री दुकाने, मद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच शहरातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्यविक्री दुकाने, मद्यालये ही संपूर्ण गणेशोत्सव काळात म्हणजेच ७ ते १७ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – किनारपट्टीवरील अतिवृष्टी कृत्रिम पावसाद्वारे टाळणे शक्य, सविस्तर वाचा ‘आयआयटीएम’मधील शास्त्रज्ञांचा अभ्यास

हेही वाचा – पावसाच्या सरींमध्ये गणरायाचे आगमन? जाणून घ्या, राज्यभरातील शनिवारचा पावसाचा अंदाज

दरम्यान, याशिवाय ज्या-ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका असतील, त्या ठिकाणी विसर्जन मिरवणूक मार्गावरील सर्व प्रकारची मद्यविक्री दुकाने, मद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.