पुणे : Maharashtra Board 12th Result महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत २.९७ टक्क्यांनी घटला. राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला. निकाल घटण्याबरोबरच राज्यातील गुणवंतही घटले आहेत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी २ हजार ३५१ ने कमी झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.१ टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१३ टक्के लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. २०२१मध्ये अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल ९९.६३ टक्के लागला होता. तर गेल्या वर्षीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास अतिरिक्त, कमी केलेला अभ्यासक्रम अशा सवलती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे २०२१च्या तुलनेत गेल्या वर्षी २०२२मध्ये निकाल घटला. यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा, गैरप्रकार रोखण्यासाठी काटेकोर नियोजन आदी उपाययोजना करण्यात आल्या. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या निकालात २.९७ टक्क्यांनी घट झाली.

करोना प्रादुर्भावापूर्वी २०२०मध्ये नियमित पद्धतीने परीक्षा झाली होती. त्या परीक्षेचा निकाल ९०.६६ टक्के निकाल लागला होता. त्यामुळे २०२०च्या परीक्षेशी तुलना करता यंदाचा निकाल ०.६९ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.५९ टक्क्यांनी अधिक आहे. यंदा एकूण निकाल घटण्याबरोबर गुणवंतांची संख्याही घटली आहे. गेल्या वर्षी राज्यातील १० हजार ३७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते, तर यंदा राज्यातील ७ हजार ६९६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. त्यामुळे ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी गेल्या वर्षीच्या तुलनेत २ हजार ३५१ने कमी झाले आहेत. 

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. यंदा परीक्षा चांगल्या वातावरणात पार पडली. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना वेळ मिळण्यासाठी वेळापत्रकात एका दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता. ३८३ समुपदेशकांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या, त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम केले. कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यात आले. त्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, विविध विभागांनी सहकार्य केले. २७१ भरारी पथके कार्यरत होती. गैरप्रकारांबाबत एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले, असे गोसावी यांनी सांगितले.

पुढील वर्षीही प्रचलित पद्धतीनेच परीक्षा

पुणे : नव्या शैक्षणिक धोरणानुसार, दहावी-बारावीच्या परीक्षा होणार नसल्याचा गैरसमज समाजमाध्यमातून पसरला आहे. याबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी स्पष्टीकरण देत पुढील वर्षीही दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याचे सांगितले.

शाखानिहाय निकाल

कला – ८४.०५ टक्के

विज्ञान – ९६.९ टक्के

वाणिज्य – ९०.४२ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम – ९१.२५ टक्के   आयटीआय – ९०.८४ टक्के

विभागीय मंडळनिहाय निकाल

कोकण – ९६.१ टक्के

पुणे : ९३.३४ टक्के 

नागपूर – ९०.३५ टक्के

औरंगाबाद – ९१.८५ टक्के

मुंबई – ८८.१३ टक्के 

कोल्हापूर – ९३.२८ टक्के

अमरावती – ९२.७५ टक्के 

नाशिक – ९१.६६ टक्के

लातूर – ९०.३७ टक्के 

गेल्या पाच वर्षांचा निकाल 

२०१८ – ८८.४१ टक्के 

२०१९ – ८५.८८ टक्के 

२०२० – ९०.६६ टक्के 

२०२१ – ९९.६३ टक्के 

२०२२ – ९४.२२ टक्के

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Result decline in talent the states 12th result konkan division tops ysh