मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मितीची शक्यता छोटय़ा व्यापारामध्ये अधिक असते. त्यामुळे स्टेशनरी, कटलरी आणि जनरल र्मचट्स अशा किरकोळ व्यापारामध्ये परदेशी भांडवल असू नये, असे मत माजी केंद्रीयमंत्री राम नाईक यांनी सोमवारी व्यक्त केले. भाजपची सत्ता असलेल्या एका राज्यातील चांगल्या योजनांची दुसऱ्या राज्यामध्ये अंमलबजावणी करणाऱ्या सुशासन सेलचा मी राष्ट्रीय प्रमुख आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या योग्य सूचना सरकापर्यंत पोहोचविण्याचे काम मी जरूर करेन, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
स्टेशनरी, कटलरी अॅन्ड जनरल र्मचट्स असोसिएशनतर्फे राम नाईक यांच्या हस्ते सुदर्शन स्टेशनरी मार्टचे किशनचंद आर्य यांना यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष एस. के. जैन यांच्या हस्ते एस. पी. स्टेशनर्सचे जगाराम लुंबाजी चौधरी यांना उत्कृष्ट दुकान पुरस्कार, ओमप्रकाश जनरल स्टोअर्सचे रामेश्वर जाजू यांना उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार, लाइफ लाइन टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सचे जीवन हेंद्रे यांना फिनिक्स पुरस्कार, द फॅमिली शॉपच्या मेधा साने यांना उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार तर, अिजक्य प्रॉडक्ट्सच्या ज्योती पुरंदरे यांना साधना गोरे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश प्रभुणे, उपाध्यक्ष राजेश गांधी, सरचिटणीस मदनसिंह रजपूत आणि खजिनदार गणपतराज जैन या वेळी व्यासपीठावर होते.
निष्कारण लोकांना त्रास होणारा आणि तोच महसूल अन्य मार्गाने येत असताना हट्टाने लागू केलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करावा ही व्यापाऱ्यांची मागणी आहे. एलबीटी बदलून त्याजागी व्हॅटवर अधिभार लावावा ही मागणी रास्त आहे, असे सांगून राम नाईक म्हणाले, ग्राहकांकडून एलबीटी वसूल करताना व्यापाऱ्यांना त्रास होतो. त्यामुळे योग्य पद्धतीने करआकारणी झाली पाहिजे ही व्यापाऱ्यांची मानसिकता आहे. आता राज्यातील सरकार एलबीटी रद्द करावा अशा निर्णयाप्रत आले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात निर्णय नाही झाला, तर ऑक्टोबरमध्ये मते मागण्यासाठी यायचे आहे. तेव्हा योग्य निर्णय घेण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे.
एस. के. जैन यांनी स्टेशनरी, कटलरी अॅन्ड जनरल र्मचट्स असोसिएशनने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेशी संलग्न असावे ही भूमिका मांडली. सुरेश प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले. दिलीप कुंभोजकर यांनी सूत्रसंचालन केले. मदनसिंह रजपूत यांनी आभार मानले.
किरकोळ व्यापारात परदेशी भांडवल असू नये – राम नाईक
मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मितीची शक्यता छोटय़ा व्यापारामध्ये अधिक असते. त्यामुळे स्टेशनरी, कटलरी आणि जनरल र्मचट्स अशा किरकोळ व्यापारामध्ये परदेशी भांडवल असू नये,
![किरकोळ व्यापारात परदेशी भांडवल असू नये – राम नाईक](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/09/ram-naik1.jpg?w=1024)
First published on: 03-06-2014 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retail trader ram naik lbt vat