पुणे :टिळक रस्त्यावर हिराबाग चौकाजवळ झाडाला बांधलेली केबल बुलेटमध्ये अडकून झालेल्या अपघातामध्ये निवृत्त पोलीस अधिकारी अरविंद पाटील जखमी झाले. त्यांच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अरविंद पाटील (वय ६८, रा. बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धोकादायक पद्धतीने झाडावर केबल लोंबकळत ठेवणारा व्यक्ती, तसेच त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय, निमशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील हे पुणे पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त होते. पुणे पोलीस दलात ते उपनिरीक्षक म्हणून रूजू झाले होते. सेवा कालावधीत त्यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील आणि त्यांचे मित्र सोमवारी (१४ एप्रिल)सकाळी नेहमीप्रमाणे सारसबागेजवळील उपाहारगृहात गेले होते. तेथून ते सकाळी सव्वादहाच्या सुमारास बुलेटवरुन घरी निघाले होते. हिराबाग चौकातील सिग्नल ओलांडून ते स्वारगेटकडे जात होते. अचानक रस्त्याच्या कडेला आलेल्या झाडाला गुंडाळलेली केबल त्यांच्या अंगावर पडून बुलेटच्या चाकात गुंडाळली गेली. पाटील यांचे नियंण सुटून ते फेकले गेले. बुलेट त्यांच्या अंगावर पडली. या अपघातामध्ये पाटील यांचा हात, तसेच पायाला दुखापत झाली

पाटील यांनी अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रय टेमघरे तातडीने घटनास्थळी पाेहाेचले. त्यांनी पाटील यांना रुग्णालयात दाखल केले. अपघातामध्ये केबलचा फटका बसल्याने त्यांच्या हाताच्या एका बोटाच्या नसांना गंभीर दुखापत झाली. प्रथमोपचारानंतर पाटील यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रस्त्यावरील झाडावर धोकादायक पद्धतीने केबल लाेंबकळत ठेवणे, तसेच या भागातील जबाबदारी असलेल्या शासकीय, निमशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अपघात झाल्याचे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

धोकादायक केबल जीवघेण्या

रस्त्यावर लोंबकळणाऱ्या केबल वायरमुळे अपघात घडतात. लोंबकळणाऱ्या केबल दुचाकीचे हँडल, तसेच चाकात अडकतात. केबल अडकल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून गंभीर स्वरुपाचे अपघात घडल्याच्या घटना यापूर्वी शहरात घडल्या आहेत. अपघातात दुचाकीस्वार, तसेच पादचारी ज्येष्ठ नागरिकांना गंभीर स्वरुपाच्या दुर्घटना घडल्या आहेत. केबल वायरमुळे पक्ष्यांना इजा होते. केबलमध्ये अडकून पक्षी जखमी होतात. केबलमध्ये अडकलेले कबुतर, घारी, कावळ्यांची सुटका अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात येते. केबल तुटल्यानंतर त्या पुन्हा पूर्वस्थितीत लावण्यात येत नाही. लोंबकळणाऱ्या केबलकडे कोणी लक्षही देत नाही. संबंधित केबल टाकणाऱ्या कंपनीने, तसेच महापालिकेतील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.