जेजुरी : साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीतील खंडोबा गडावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. चंद्रपूर जिल्ह्यातून सहकुटुंब दर्शनासाठी आलेल्या एका निवृत्त प्राध्यापिकेची पिशवी गडावर विसरली. पिशवीत दहा लाख रुपयांचे दागिने आणि रोकड होती. गडावरील श्री मार्तंड देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना ही पिशवी सापडली आणि त्यांनी महिलेला पिशवी परत केली. पिशवी परत मिळाल्याने महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रृ तरळले आणि ‘मल्हारीच्या दारी’ प्रामाणिकपणाची प्रचितीही त्यांना आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राध्यापिका डाॅ. सुधा माळधुरे कुटुंबासह सोमवारी (२० जानेवारी) सहकुटुंब दर्शनासाठी आल्या होत्या. देवदर्शन केल्यानंतर त्या गडाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या प्रसाधनगृहात गेल्या. गडबडीत त्यांनी घोड्यांच्या पागेजवळ असलेल्या भिंतीवर पिशवी ठेवली. पिशवीत दहा लाखांचे सोन्याचे दागिने आणि दहा हजारांची रोकड होती. गडबडीत त्या गड उतरून खाली उतरल्या आणि मोटारीतून पुन्हा पुण्याकडे निघाल्या.
हेही वाचा >>>तीर्थक्षेत्र दर्शनासाठी राज्याला अतिरिक्त रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा; कुंभमेळ्यामुळे गाड्यांची कमतरता
त्यानंतर देवसंस्थानचे कर्मचारी सुनील भोसले आणि बाळासाहेब पाठक यांंनी घोड्याच्या पागेजवळ पिशवी सापडली. ही पिशवी त्यांनी देवस्थानच्या कार्यालयात जमा केली. पिशवीत दागिने, रोकड आणि कागदपत्रे होती. कागदपत्रात प्रा. माळधुरे यांचा मोबाइल क्रमांक होता. त्यांनी प्रा. माळधुरे यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. दरम्यान, माळधुरे कुटुंबीय गडावरुन उतरले आणि मोटारीतून सासवडपर्यंत पाेहाेचले होते. देवस्थानच्या कार्यालयातून त्यांच्य मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. ‘गडावरील घोड्यांच्या पागेजवळ दागिने असलेली पिशवी सापडली आहे’, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर माळधुरे कुटुंबीय पुन्हा जेजुरीत आले.
हेही वाचा >>>पुणे: पुढील २० वर्षांच्या प्रदूषणाचे नियोजन करा, प्रदूषण महामंडळाच्या सूचना !
माणसाच्या रुपात देव
दागिने आणि रोकड असलेली पिशवी परत मिळाल्याने प्रा. सुधा माळधुरे यांच्याा डोळ्यात आनंदाश्रृ तरळले. मार्तंड देवसंस्थानमधील कर्मचारी सुनील भोसले आणि बाळासाहेब पाठक यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक त्यांनी केले. माणसाच्या रुपात देव भेटला, अशी प्रतिक्रिया प्रा. माळधुरे यांनी व्यक्त केली. देवस्थानचे विश्वस्त विश्वस्त अभिजित देवकाते आणि सहकाऱ्यांनी भोसले आणि पाठक यांचे कौतुक केले. दोघांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक जेजुरीीतील रहिवाशांनी केली.