पिंपरी : लष्करातील सेवानिवृत्त सुभेदाराने १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना बोपखेल येथे घडली. या प्रकरणी स्थानिकांनी त्याला पकडून मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

लाला मोहम्मद शेख (वय ६५, रा. रामनगर, बोपखेल) असे गुन्हा दाखल झालेल्या सेवानिवृत्त सुभेदाराचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा लष्करातील सेवानिवृत्त सुभेदार असून, तो बोपखेल येथे भाडेतत्त्वावर राहतो. दहा दिवसांपूर्वी तो बोपखेल येथे वास्तव्यासाठी आला होता. त्याची पत्नी आणि मुले दुसऱ्या ठिकाणी राहतात. शेख हा त्याच्या खोलीत पीडित १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत होता. याबाबत स्थानिक नागरिकांना माहिती मिळाली. त्यांनी शेख याला पकडून मारहाण केली, तसेच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाणीत जखमी झाल्याने शेख याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.