पुणे : Maharashtra Weather Forecast अनेक दिवसांच्या खंडानंतर राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली. आगामी ४८ ते ७२ तासांत राज्यात पाऊस वाढण्याचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पिवळा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मोसमी पाऊस अंशत: सक्रिय झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत शनिवारी मुसळधार ते मध्यम पावसाची नोंद झाली. आगामी ४८ ते ७२ तासांत राज्यात सर्वत्र जोरदार ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात ३ आणि ४ सप्टेंबर, मराठवाडय़ात ३ ते ५ सप्टेंबर अणि विदर्भात ३ ते ६ सप्टेंबरपर्यंत पिवळा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोकणात त्या तुलनेत कमी पाऊस राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. शनिवारी दिवसभरात कोल्हापूर, रायगड, सांगली, पुणे या जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला. राज्यात २४ तासांत लोणावळा येथे १०५ मिमी, तर चिंचवड येथे ८३ मिमी पावसाची नोंद झाली.