पुणे : नैर्ऋत्य मोसमी पाऊस आठवडय़ाच्या कालावधीत राज्यातून निघून जाण्याची शक्यता असतानाच त्यापूर्वी होत असलेल्या पावसाने राज्याच्या विविध भागांत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. शेतीमालाचेही त्याने मोठे नुकसान केले आहे. मोसमी पावसाच्या चार महिन्यांच्या हंगामात ३० सप्टेंबपर्यंत राज्यात सरासरीच्या तुलनेत २४ टक्के अधिक पाऊस झाला होता. हंगामात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाची पावसात आघाडी होती. कोकणसह मुंबई परिसरात मात्र नेहमीच्या तुलनेत कमी पाऊस झाला होता. हंगामानंतरचा आणि परतीचे वेध लागलेल्या पावसाने मात्र हे चित्र काही प्रमाणात बदलून टाकले आहे. २० सप्टेंबरपासून राजस्थानमधून मोसमी पावसाने परतीचा प्रवास सुरू केला असला, तरी त्याचा प्रवास विलंबाने होतो आहे. या कालावधीत बंगालचा उपसागर, दक्षिणेकडील राज्ये, अरबी समुद्र आदी ठिकाणाहून कमी दाबाचे पट्टे आणि वाऱ्यांची चक्रिय स्थिती निर्माण झाली. यासह स्थानिक परिस्थितीही राज्यातील पावासाला कारणीभूत ठरली. त्यातून गेल्या १२ दिवसांमध्ये राज्यात विविध भागांत मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला. काही भागांत अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाल्याने काढणीला आलेल्या आणि काढणी झालेल्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
हंगामानंतर राज्यात सुमारे ५० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात सर्वाधिक ७१ टक्के, तर त्यापाठोपाठ मध्य महाराष्ट्रात ४३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. कोकण विभागात ३० टक्के, तर मराठवाडय़ात २८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये दुपटीपेक्षा अधिक पाऊस असून, नऊ जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीच्या तुलनेत पुढे आहे.
दोन दिवसांनंतर काय?
राज्याच्या बहुतांश भागात पाऊस दोन दिवसांनंतर विश्रांती घेणार आहे. येत्या तीन-चार दिवसांत मध्य भारतातील काही भागांतून मोसमी पाऊस माघारी फिरणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातून पाऊस परतीचा प्रवास करील. पुढील दोन दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
हंगामानंतरचा सर्वाधिक पाऊस (सरासरीच्या तुलनेत अधिक)
भंडारा (२१८ टक्के), धुळे (२०९ टक्के), मुंबई शहर (१७८ टक्के), गोंदिया (१७२ टक्के), जळगाव (१५६ टक्के), वाशिम (१४० टक्के), ठाणे (११९ टक्के), नागपूर (११८ टक्के) यवतमाळ, अमरावती (११३ टक्के) अकोला (११४ टक्के), नंदूरबार (११८ टक्के), मुंबई उपनगर (९७ टक्के), रायगड (९२ टक्के), औरंगाबाद (७३ टक्के)
गेल्या १२ दिवसांत..
कमी वेळेत अधिक पाऊस होत असून, हंगाम संपल्यानंतर राज्यात गेल्या १२ दिवसांत सरासरीच्या तुलनेत ५० टक्के अधिक पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस विदर्भात सरासरीपेक्षा ७१ टक्के अधिक पाऊस झाला आहे.
पाऊसभान..
मुंबई, ठाणे, धुळे, जळगाव, भंडारा, गोंदिया, वाशिम आदी जिल्ह्यांत दुप्पट ते तिप्पट पाऊस झाला आहे. येत्या दोन दिवसांनंतर मात्र पावसाचा जोर सर्वत्र कमी होणार आहे.
पश्चिम उपनगराला झोडपले
मुंबई : पश्चिम उपनगरात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळला. तर, पूर्व उपनगर आणि शहरातही तुरळक पावसाच्या सरी बसरल्या. ऑक्टोबर महिना हा उष्णता वाढीचा असतो, मात्र या महिन्यात जोरदार पावसाने मुंबईसह राज्याला झोडपून काढले आहे. बुधवारीही सकाळपासून पश्चिम उपनगरात पावसाच्या जोरधारा बरसल्या. दिवसभर अंधेरी, विलेपार्ले, मरोळ, सांताक्रूझ या भागात १० ते ३० मिमी पावसाची नोंद झाली. तर, मुंबई शहरात आणि पूर्व उपनगरात खूप हलका पाऊस बरसला. दुपारच्या सुमारास कुर्ला, दादर, भायखळा येथे जोरधारांचा पाऊस कोसळला. बुधवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे २७ मिमी पावसाची नोंद झाली. तर, कुलाबा येथे शून्य मिमी पावसाची नोंद झाली.