पुणे : पुणे महापालिकेला अतिरिक्त आयुक्त मिळत नसताना महसूल विभागाने पुणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर उपायुक्तपदावर आलेल्या महेश पाटील यांना पदोन्नती देऊन त्यांची अपर आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या आकृतिबंधात अपर आयुक्तपद नसतानाही पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपदाच्या दोन जागा गेल्या दहा महिन्यांपासून रिक्त आहेत. या जागांवर आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी, यासाठी महापालिकेचे, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू आहेत. या जागांवर लवकरच सक्षम अधिकारी दिले जातील, असा विश्वास शहरातील महायुतीमधील वरिष्ठ नेते व्यक्त करीत आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करून महसूल विभागाने उपायुक्त पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला पदोन्नती देऊन त्यांची नियुक्ती महापालिकेत अपर आयुक्तपदावर केल्याने याची उलटसुलट चर्चा महापालिकेत सुरू झाली आहे.

पुणे महापालिका ही अ प्लस दर्जाची महापालिका असल्याने तीन जागा या अतिरिक्त आयुक्तपदाच्या मान्य आहेत. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहणारे डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे या तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यापैकी खेमणार यांच्या जागी पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती करण्यात आली. दोन जागा अद्यापही रिक्त आहेत.

प्रतिनियुक्तीची मुदत काही आठवड्यांमध्ये संपण्यापूर्वी निर्णय

उपजिल्हाधिकारी असलेले महेश पाटील हे पुणे महापालिकेत उपायुक्त प्रतिनियुक्तीवर आले होते. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी आहे. त्यांच्या प्रतिनियुक्तीची मुदत काही आठवड्यांमध्ये संपणार आहे. मंगळवारी अचानक राज्याच्या महसूल व वन विभागाने महेश पाटील यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती दिली आणि पुणे महापालिकेच्या अपर आयुक्तपदी त्यांना प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्तांचेच काम पाहण्याची शक्यता

प्रशासकीय निकड म्हणून सार्वजनिक सेवेच्या लोकहितास्तव सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर अपर जिल्हाधिकारी या पदावर पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपात अपर महापालिका आयुक्तपदी महेश पाटील यांची नियुक्ती केल्याचे आदेशात नमूद केले आहे. पाटील यांच्याकडे असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीतून सुमारे १२५ कोटींची कामे सुरू आहेत. हे काम ‘महाप्रित’ या संस्थेला दिले आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी त्यांना ही बक्षिसी देण्यात आल्याची चर्चा महापालिकेत दबक्या आवाजात सुरू आहे. पाटील यांची नियुक्ती अपर आयुक्त म्हणूून झाली असली, तरी ते अतिरिक्त आयुक्तांचेच काम पाहण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री, कॅबिनेट मंत्र्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे रिक्त असल्याने या पदांवर नियुक्ती करावी अशी आग्रही मागणी केली जात होती. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मात्र याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

Story img Loader