लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ‘महसूल वसुलीचे प्रत्येक जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट साध्य करण्याकडे लक्ष द्यावे, अधिकाधिक वसुली करण्यात यावी,’ अशा सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात अधिकाऱ्यांना केल्या. प्रत्येक जिल्ह्यात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक, तर कामात कुचराई करणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

विभागीय आयुक्तालयात पुणे विभागातील पाच जिल्ह्यांची महसूलमंत्री बावनकुळे यांनी आढावा बैठक घेतली. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर आयुक्त कविता द्विवेदी, अपर आयुक्त समीक्षा चंद्रकार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे ‘बीडीपी’बाबत मोठे वक्तव्य, म्हणाल्या…

बावनकुळे म्हणाले, ‘महसुलात वाढ होण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना अधिकाऱ्यांनी सांगितल्यास त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पुणे विभागात सर्वोत्कृष्ट आणि कमी प्रमाणात काम करणाऱ्या तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येकी तिघांची यादी पाठवा. कोणाचे काम चांगले आणि कोणाचे कमी आहे याचे मूल्यमापन केले जाईल. कमी काम करणाऱ्यांना सुधारण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरही कामात कुचराई झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.

वाळू धोरण लवकरच

राज्य सरकारचा नवीन वाळू धोरणाबाबत सध्या अभ्यास सुरू आहे. त्याचा सर्वंकष आराखडा तयार करण्यात येत आहे. आराखड्याचा मसुदा तयार झाल्यावर त्यावर हरकती व सूचना मागविल्या जातील. नागरिकांना त्यांच्या सोयीच्या नोंदणी कार्यालयात दस्ताची नोंदणी करता यावी यासाठी ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ योजना तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-पिंपरी : महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा बनला लष्करी अधिकारी, सर्व स्तरातून कौतुक

अर्ध्या तासात गुंडाळला जनता दरबार

महसूलमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात घेतलेल्या पहिल्या जनता दरबाराकडे नागरिकांनी पाठ फिरविली. या जनता दरबारामध्ये कार्यकर्त्यांचीच मोठी गर्दी झाली होती. विधानभवन येथे दुपारी दोन ते चार या वेळेत नागरिकांसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. दोन तासांच्या जनता दरबारात केवळ ४० नागरिकांनी महसूलमंत्री बावनकुळे यांच्यासमोर समस्या मांडल्या. त्यामुळे अर्ध्या तासात दरबार गुंडाळण्यात आला.

Story img Loader