पुणे : ‘शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीच्या निळ्या तसेच लाल पूररेषांच्या पुनरावलोकनासाठी जलसंपदा विभागाने महाराष्ट्र इंजिनिअर्स रिसर्च इन्स्टीट्यूट (मेरी) कडे अभ्यास करण्याचे काम दिले होते. ‘मेरी’ ने याबाबतचा अहवाल जलसंपदा विभागाकडे दिला आहे. या अहवालानुसार शहरातील सध्या अस्तित्वात असलेल्या निळी आणि लाल पूर रेषा दुपटीने विस्तारणार आहे,’ अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालावर गांभीर्याने विचार करून ‘महापालिकेने सावध होत नदीचे पात्र अरुंद होणार नाही याची काळजी घ्यावी,’ अशी मागणी पर्यावरण अभ्यासक सारंग यादवाडकर, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यादवाडकर आणि कुंभार यांनी ‘मेरी’ संस्थेने जलसंपदा विभागाकडे सादर केलेल्या अहवालाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ही मागणी करण्यात आली. जलसंपदा विभागाने २०११ मध्ये मुळा-मुठा नदीची निळी, लाल पूर रेषा जाहीर केली. त्यानुसार महापालिका नदीकाठच्या भागात बांधकामांना परवानगी देत होती. मात्र, त्यानंतर २०१७ मध्ये महापालिकेचा विकास आराखडा अंतिम करण्यात आला. त्या वेळी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांने मुख्य अभियंत्यांची मान्यता न घेताच पालिकेस पूररेषेचा नकाशा दिला. यामध्ये, पूररेषा कमी करण्यात आली होती. ही बाब समोर आल्यानंतर पर्यावरण अभ्यासक सारंग यादवडकर, विवेक वेलणकर आणि विजय कुंभार यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

यावर न्यायालयाने उच्च स्तरीय समिती नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने जलसंपदा विभागाच्या मुख्य अवर सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने पूररेषांचे काम मेरी या संस्थेस दिले होते. जलसंपदा विभागाने यापूर्वी तयार केलेल्या अहवालामध्ये खडकवासला धरण ते मुळा-मुठा नदीच्या संगमपर्यंत जुन्या निळया पूररेषेपर्यंत ६० हजार क्यूसेक पाण्याच्या पातळी पर्यंत होती.

मेरीच्या अहवालात ही रेषा आता ९८ हजार ७९५ क्यूसेक पाणी सोडल्यानंतर पाणी जाणाऱ्या भागापर्यंत दाखविण्यात आली आहे. तर लाल पूर रेषा हे आधी ५९ हजार क्यूसेक पाणी सोडल्यानंतर ज्या भागात पाणी जात होते, तिथपर्यंत होती. पण मेरी च्या अहवालामध्ये ही रेषा आता आणखी विस्तारणार असून १ लाख ६० हजार क्यूसेकचे पाणी ज्या ठिकाणापर्यंत पोहोचेल तेथे असणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Review of blue and red flood lines of mula mutha river pune print news ccm 82 ssb