पुणे : राज्यात ३ लाख ९१ हजार १४४ विद्यार्थ्यांनी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. मात्र काही कारणांमुळे विद्यार्थ्यांना नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरता आला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षण विभागाने प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्यास गुरुवारपर्यंत (१४ जून) मुदतवाढ दिली. तसेच अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी २१ जूनला जाहीर होणार आहे.
हेही वाचा >>> Pune- Mumbai Accident: पाच तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना पाणी, जेवण देणारे देवदूत!
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात ३ लाख ९१ हजार १४४ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३ लाख ३५ हजार ३३४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून अंतिम केले. तर ३ लाख २९ हजार १९८ विद्यार्थ्यांनी अर्जाची पडताळणी पूर्ण केली आहे. २ लाख ५२ हजार ४२३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले आहेत. राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला १४ जूनला मिळणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रवेश अर्जाचा भाग एक भरता आला नाही. त्यामुळे प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना १४ जूनला सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येईल.
हेही वाचा >>> पुणे : पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उद्या वाहतूक बदल
१५ जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. १५ ते १७ जून दरम्यान सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदवता येतील. १७ जूनला प्रवेश अर्जाचा भाग दोन भरता येईल. पहिली अंतिम गुणवत्ता यादी २१ जूनला जाहीर करण्यात येईल. तर २१ ते २४ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल. राखीव जागांअंतर्गत (कोटा) प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना १८ ते २० जून या कालावधीत अर्ज करता येईल. कोटाअंतर्गत प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी २१ जूनला जाहीर केली जाईल. कोटाअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश २१ ते २४ जून या कालावधीत निश्चित करण्यात येतील. तर २४ जूनला कोटाअंतर्गत रिक्त जागा प्रत्यार्पित करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.