पुणे : व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध समाइक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) सुधारित संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पूर्वी जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकापेक्षा काही परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.
राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध सीईटींचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र, सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा आणि सीईटी सेलतर्फे बीबीए, बीसीए, बीएमएस सीईटी, पाच वर्षे मुदतीच्या विधी अभ्यासक्रमाची सीईटी एकावेळी होणार असल्याचे समोर आले होते. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्याची मागणी विद्यार्थी, पालकांकडून करण्यात आली होती. त्याची दखल घेत सीईटी सेलने वेळापत्रकात काही बदल करून नव्याने वेळापत्रक जाहीर केले आहे.
हेही वाचा – शुश्रुषा करणाऱ्या महिलेकडून दागिन्यांची चोरी; महिला अटकेत; साडेआठ लाखांचे दागिने जप्त
अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची एमएचटी-सीईटी आधीच्याच वेळापत्रकानुसार ९ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीत होणार आहे. तीन वर्षे मुदतीच्या विधी अभ्यासक्रमासाठीची सीईटी २० ते २१ मार्च रोजी, तर पाच वर्षे मुदतीच्या विधी अभ्यासक्रमासाठीची सीईटी २८ एप्रिल रोजी होणार आहे. तर एमसीए सीईटी २३ मार्चला, तर एमबीए सीईटी १ ते ३ एप्रिल रोजी होणार आहे. बीबीए, बीसीए, बीएमएस सीईटी ३० एप्रिल ते ३ मे या कालवधीत होणार आहे. सविस्तर वेळापत्रक सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पाच वर्षीय विधी सीईटीसाठी नोंदणी सुरू
सीईटी सेलने विविध अभ्यासक्रमांच्या सीईटीची नोंदणी सुरू केली आहे. आता आता पाच वर्षीय विधी सीईटीची नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, अर्ज भरण्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. आहे.