पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ब्रिटिशकालीन हत्ती तलावाचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. पुनरुज्जीवनापूर्वी दोन लाख लीटर साठवणक्षमता असलेल्या या तलावातील पाण्याची पुनरुज्जीवनानंतर साठवणक्षमता साठ लाख लीटपर्यंत वाढली असून, हत्ती तलाव भरल्यानंतर सांडव्यातून बाहेर पडणारे पाणी साठवण्यासाठी नव्या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे.

कर्वे समाज संस्थेच्या बी. डी. कर्वे रीसर्च आणि सामाजिक उत्तरदायित्व विभागाचे प्रमुख डॉ. महेश ठाकूर यांनी ही माहिती दिली. कर्वे समाज संस्थेच्या पुढाकारातून आणि कमिन्स इंडियाच्या सामाजिक उत्तरदायित्वाअंतर्गत उपलब्ध हत्ती तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम करण्यात आले. गेली दोन वर्षे पुनरुज्जीवनाचे काम सुरू होते. या कामाची कोनशिला बसवण्याचा कार्यक्रम शुक्रवारी (२२ एप्रिल) विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, कमिन्स इंडियाच्या कॉर्पोरेट अधिकारी सौजन्या व्ही. गुरू, कर्वे समाज संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाठक आदी उपस्थित राहणार आहेत.

डॉ. ठाकूर म्हणाले, की ऐतिहासिक हत्ती तलावात गाळ आणि बांधकामाचे शिल्लक साहित्य टाकल्याने तो पाणीसाठवणासाठी निरुपयोगी ठरला होता. त्यामुळे या तलावाच्या पुरुज्जीवनाच्या कामाचा प्रस्ताव विद्यापीठाला देण्यात आला. या प्रस्तावाला कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि कमिन्स इंडियाने मान्यता दिली. या कामाअंतर्गत तलावाच्या भितींचे बळकटीकरण, पर्जन्य पुनर्जलभरणाची व्यवस्था करण्यात आली. या कामाचा सकारात्मक परिणाम होऊन विद्यापीठ परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची भूजल पातळी वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच तलावाची पाणीसाठवण क्षमताही साठ लाख लीटपर्यंत वाढली आहे.

तलावाच्या पाण्याचा वृक्षलागवडीसाठी वापर

 तलावाच्या परिसरात २७ प्रजातीची वृक्षलागवड करण्यात आली आहे. या नक्षत्र वनातील झाडांची जोपासणूक करण्यासाठी तलावातील पाणी सूक्ष्म सिंचन पद्धत वापरण्यात येत आहे. पुनरुज्जीवनानंतर तलावात कासव, विविध पक्ष्यांचा वावर वाढल्याचे डॉ. ठाकूर यांनी नमूद केले.