लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठात गेली ७५ वर्षे सुरू असलेल्या संस्कृत शब्दकोश प्रकल्पाचे केंद्र सरकारच्या सहकार्याने पुनरुज्जीवन होणार आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठासह अन्य विद्यापीठांकडून या प्रकल्पासाठी सहकार्य दिले जाणार असून, या प्रकल्पासाठी एकूण २९ पदे भरली जाणार आहेत. तसेच आतापर्यंत डिजिटाझेशन करण्यात आलेली कागदपत्रे, कोशाचे खंड संकेतस्थळाद्वारे येत्या दोन महिन्यांत खुले करण्यात येणार आहेत.

संस्कृत शब्दकोश प्रकल्पासाठी केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, डेक्कन कॉलेज यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे प्रधान सचिव संजय मूर्ती, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद पांडे, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान महासंघाचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, शब्दकोशाचे प्रधान संपादक डॉ. प्रसाद जोशी या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-शिवकालीन घराण्यांच्या ऐतिहासिक वास्तू, शस्त्र, दस्तावेजांचे संवर्धन

डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत शब्दकोशाचा प्रकल्प ७५ वर्षे सुरू आहे. सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारचा त्यात सहभाग होता. मात्र कालांतराने पदे रिक्त होत गेली. त्यामुळे शब्दकोशाच्या कामावर परिणाम होऊन ते मंदावले होते. मात्र आता केंद्र सरकारने यात लक्ष घातले आहे. पुन्हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे, असे डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले.

संजय मूर्ती म्हणाले, की संस्कृत शब्दकोश प्रकल्पाचे काम प्रचंड आहे. पुढील दोन महिन्यात हा कोश सर्वसामान्यांना पाहता येणार आहे. हस्तलिखिते डिजिटल माध्यमात आणली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी अजून खूप काम करावे लागणार आहे. त्यामुळे अन्य विद्यापीठांचे सहकार्य घेतले जाईल. डेक्कन कॉलेज देशभरातील संस्कृत विभागांना त्यासाठी मार्गदर्शन करेल. विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षणासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम निर्माण केला जाईल. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला या प्रकल्पासाठी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाचे काम जागतिक पातळीवर नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र घेऊन त्यात हा प्रकल्प सादर केला जाणार आहे.

आणखी वाचा-महाराष्ट्राचे मॉडेल नेणार देशपातळीवर, पुढील वर्षीपासून सात नवे अभ्यासक्रम

भारतीय ज्ञान प्रणालीचा ‘विकिपीडिया’

कोश प्रकल्पात तंत्रज्ञान वापरल्याने काम सोपे होईल. आतापर्यंत केलेले दस्तऐवजीकरण संकेतस्थळाद्वारे खुले केले जाईल. एका अर्थाने, संस्कृत शब्दकोश प्रकल्प भारतीय ज्ञान प्रणालीचा ‘विकिपीडिया’ ठरेल. आगामी काळात अन्य भाषांसाठीही असा प्रकल्प करता येऊ शकेल, असे डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revival of the sanskrit dictionary grand project with support from the central government pune print news ccp 14 mrj
Show comments