न्यायसहाय्यक प्रयोगशाळेत जप्त केलेले देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आणि काडतुसे जमा करण्यासाठी आलेल्या नगरमधील पोलीस कर्मचाऱ्याला दारू पिण्याचे व्यसन अंगलट आले. दारू प्यायलेला पोलीस कर्मचारी चक्क पदपथावर झोपला आणि चोरटय़ाने ही संधी साधली. पोलीस कर्मचाऱ्याच्या पिशवीतून देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आणि दोन काडतुसे लांबवून चोरटा पसार झाल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली.
नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेले पोलीस कर्मचारी संजय अंबादास माने (रा. भेकराईनगर, हडपसर )यांनी यासंदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी माने हे २००१ मध्ये राज्य राखीव पोलीस दलात भरती झाले. तेथून ते नगर पोलीस दलात नियुक्तीस आले. नगरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांकडून देशी बनावटीचे रिव्हॉल्वर जप्त केले होते. त्याअनुषंगाने रिव्हॉल्वर आणि दोन काडतुसे मुंबईतील न्यायसहाय्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार होती. तसेच दोन व्हिसेरा (आतडय़ांचे नमुने ) पुण्यातील बै. जी. वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात येणार होते.
पोलीस कर्मचारी माने हे नगरहून बसने शुक्रवारी पुणे एसटी स्थानकावर आले. त्यांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास व्हिसेरा बै.जी. वैद्यकीय महाविद्यालयात जमा के ले. त्यानंतर त्यांनी दारू प्याली. माने यांची तेथे एकासोबत वादावादी झाली. त्याला घेऊन ते रेल्वे स्थानकाच्या परिसरात असलेल्या पोलीस ठाण्यात गेले. लोहमार्ग पोलिसांना याप्रकाराची त्यांनी माहिती दिली. सायंकाळी माने यांनी रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या एका दुकानात पुन्हा दारू प्याली. काही अंतरावर असलेल्या गुडलक बेकरीच्या पायरीवर माने बसले. काही वेळानंतर नशेत असलेले माने तेथेच झोपले. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते जागे झाले आणि पिशवीची तपासणी केली. तेव्हा पिशवीतील रिव्हॉल्वर आणि दोन काडतुसे लांबविल्याचे निदर्शनास आले. भानावर आलेल्या माने यांनी बंडगार्डन पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पी. आर. कठोरे तपास करत आहेत.
या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दोषीवर निश्चितच कारवाई केली जाईल.
पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी (अहमदनगर जिल्हा पोलीस प्रमुख )
मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याच्या पिशवीतून रिव्हॉल्वर चोरीस
न्यायसहाय्यक प्रयोगशाळेत जप्त केलेले देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आणि काडतुसे जमा करण्यासाठी आलेल्या नगरमधील पोलीस कर्मचाऱ्याला दारू पिण्याचे व्यसन अंगलट आले.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-01-2016 at 02:50 IST
TOPICSरिव्हॉल्व्हर
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revolver theft of police