व्यापाऱ्यांना मिळणारा फायदा आणि शेतकऱ्यांना मिळणारा दर याचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सामाजिक जाणीव जपण्याचे काम करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.
दि पूना र्मचट्स चेंबरतर्फे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आदित्य बिल्डर्सचे केवलचंद कटारिया, जयहिंदू कलेक्शन्सचे नगराज जैन आणि सी. एच. सुगंधी अँड सन्सचे भगवानदास सुगंधी यांना व्यापार महर्षी उत्तमचंद ऊर्फ बाबा पोकर्णा स्मृती आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘लोकसत्ता’चे बातमीदार विनायक करमरकर यांना ‘वीरेन गवाडिया आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महापौर दत्ता धनकवडे, आमदार माधुरी मिसाळ, उद्योजक राजेंद्र तापडिया, चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, सहसचिव रायकुमार नहार, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, राजेंद्र बाठिया आणि पोपटलाल ओस्तवाल या वेळी उपस्थित होते.
भटजी आणि शेटजी यांचा पक्ष अशी ओळख असलेल्या पक्षाने व्यापाऱ्यांना विसरू नये, अशी भावना केवलचंद कटारिया यांनी व्यक्त केली. पूर्वीची ओळख विसरून व्यापारी, शेतकरी, कामगार, झोपडपट्टीवासीय अशा साऱ्यांचेच पाठबळ मिळाल्यानेच पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये आला, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. व्यापार वाढतो त्याबरोबर विकास होतो आणि रोजगारही वाढतो याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, व्यापारी जेवढे महत्त्वाचे तेवढेच धान्य पिकविणारे शेतकरीदेखील महत्त्वाचे आहेत. व्यापाऱ्यांना नफा झाला पाहिजे, त्याचबरोबरीने शेतकऱ्यांनाही रास्त भाव मिळाला पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा समतोल राखण्याचा प्रयत्न सरकार करेल.
समन्वयाची भूमिका घेणाऱ्या बाबा पोकर्णा यांनी व्यापारी आणि हमाल यांचा संप कधीही होऊ दिला नाही, अशी आठवण गिरीश बापट यांनी सांगितली. गुणी, कर्तृत्ववान आणि चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार केल्यामुळे नव्या पिढीच्या व्यापाऱ्यांना प्रेरणा मिळेल. राज्यातील व्यापाऱ्यांना जो त्रास होत होता तो स्थानिक संस्था कर रद्द केल्यामुळे कमी झाला आहे. व्यापारी पैशाने आणि मनाने मोठे आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी हमालांसह विविध घटकांना आपल्या हितामध्ये सामावून घ्यावे, असे आवाहन बापट यांनी केले.
दत्ता धनकवडे, माधुरी मिसाळ आणि राजेंद्र तापडिया यांनी मनोगत व्यक्त केले. प्रवीण चोरबेले यांनी प्रास्ताविक केले. रायकुमार नहार यांनी आभार मानले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा