परदेशी पद्धतीच्या पदार्थाची खासियत असलेल्या अनेक रेस्टॉरंट्समध्ये जेवणाबरोबर वाइनदेखील चाखली जाते. द्राक्षांव्यतिरिक्त इतर फळांच्या वाइन आता बाजारात मिळू लागल्या असून, ‘वाइन अँड डाइन’ संस्कृतीची आवड असलेल्या खवय्यांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. पुण्यातील नऱ्हे येथे २०१० मध्ये सुरू झालेली ‘ऱ्हिदम वाइनरी’ ही फळांच्या वाइन बनवणाऱ्या काही अगदी मोजक्या ‘वाइनरीज’पैकी एक. सहा वेगवेगळय़ा फळांपासून त्यांनी बनवलेल्या वाइन्स सध्या बाजारात आहेत.

‘कॉन्टिनेंटल’ अन्नपदार्थानी आपल्या खाद्यसंस्कृतीत झटपट शिरकाव केला आणि त्याबरोबरच त्यांची ‘वाइन अँड डाइन’ संस्कृतीही आली. कोणत्या ‘कुझीन’बरोबर कोणती वाइन चांगली लागेल, अशा चर्चा होऊ लागल्या. नाशिकला गेल्यानंतर नुसती द्राक्षे न आणता तिथल्या ‘वाइनरी’ची सफर करणे हीदेखील पर्यटनातील लोकप्रिय गोष्ट झाली. परंतु आता वाइन म्हणजे केवळ द्राक्षाचीच ही संकल्पना हळूहळू बदलते आहे. द्राक्षाच्या वाइनबरोबरच इतर फळांच्या वाइनचेही एक ‘निश मार्केट’ उभे राहिले आहे. ‘वाइन अँड डाइन’ संस्कृतीत चपखल बसणाऱ्या या फळांच्या वाइन बनवणाऱ्या मोजक्या उत्पादकांपैकी एक वाइनरी पुण्यातच नऱ्हे येथे आहे. तीच ‘ऱ्हिदम वाइनरी.’

‘हिल क्रेस्ट फूड्स अँड बिव्हरेजेस प्रा. लि.’ या कंपनीचा ‘ऱ्हिदम’ हा ब्रँड आहे. हापूस आंबा, स्ट्रॉबेरी, किवी, अननस, पीच आणि प्लम या फळांच्या वाइन्स येथे बनवल्या जात असून, सध्या महाराष्ट्राबरोबरच गुजरातमध्ये त्या पुरवल्या जातात. मूळचे सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले अकल्पित प्रभुणे हे या वाइन्सच्या उत्पादन व विक्रीचे काम पाहतात, तर विदिता मुंगी या विपणन व प्रसिद्धीकडे लक्ष देतात.

परदेशी खाद्यसंस्कृतीत असलेल्या वाइनच्या स्थानाचा विचार केला तर इतर ‘अल्कोहोलिक’ पेयांपेक्षा वाइनला एक वेगळा दर्जा दिला जात असल्याचे दिसून येते. वाइन बनवण्याची प्रक्रिया ही एक कलाच मानली जाते. फळांची वाइन बनवण्याची प्रक्रिया आणखी थोडी वेगळी असते. ‘ऱ्हिदम’च्या वाइन्स फळांपासून बनवलेल्या असल्या तरी त्यात द्राक्षे असतातच. वाइनची विशिष्ट चव, पोत आणण्यासाठी द्राक्षे लागतात. त्यामुळे ६० टक्के द्राक्षे आणि ४० टक्के दुसरे फळ वापरून या वाइन्स केल्या जातात. जे फळ वापरले जाईल त्याचा स्वाद त्या वाइनला मिळतो. या वाइन्समध्ये साधारणत: १२ टक्के अल्कोहोल असते. नेहमीच्या द्राक्षाच्या वाइन्समध्ये १२ ते १५ टक्के अल्कोहोल असते.

फळांची वाइन तयार करण्यासाठी प्रथम फळांचा रस काढला जातो आणि पहिले एक ते दोन दिवस तो ५ अंश सेल्सिअसला थंड केला जातो. या प्रक्रियेत फळांचा रस आणि चोथा वेगळा होतो. त्यानंतरचा टप्पा वाइनच्या ‘फरमेंटेशन’चा अर्थात ‘यीस्ट’ वापरून आंबवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा. फळांच्या वाइनसाठी ही आंबवण्याची प्रक्रिया सावकाश आणि जवळपास चार ते पाच आठवडे चालते. यात त्या मिश्रणाचे तापमान काटेकोरपणे विशिष्ट राखावे लागते. एक महिन्यानंतर वाइनमधील गाळ काढून द्रव वेगळा काढला जातो. ही प्रक्रियाही तीन ते चार वेळा आणि दोन ते अडीच महिन्याचा कालावधी देऊन करावी लागते. म्हणजेच जवळपास चार महिन्यांनंतर प्राथमिक स्वरूपाची वाइन बनते. त्यानंतरही वाइनमध्ये काही कण उरलेले असतातच. ते दूर केल्यानंतर वाइन एक ते दीड महिना तशीच ठेवली जाते. याला वाइन ‘मॅच्युअर’ करणे असे म्हणतात. अशी मुरलेली वाइन बाटलीत भरून बाजारात आणली जाते. म्हणजेच फळांचा गर काढल्यानंतर त्याची वाइन तयार होण्यासाठी ६ ते ८ महिने लागतात.

वाइन जितकी जुनी तितकी चांगली असे म्हटले जाते. परंतु फळांच्या वाइनला हा नियम लागू नाही. वाइन जसजशी जुनी होते तसा त्यातील फळांचा स्वाद कमी होत जातो. फळांच्या वाइनमध्ये त्या विशिष्ट फळाचा स्वाद येणे हाच उद्देश असल्यामुळे वाइन मुरवण्याचा कालावधी कमी असतो आणि वाइन बनल्यानंतर साधारणत: एक वर्षांच्या आत प्यायल्या जातात.

‘ऱ्हिदम’च्या स्ट्रॉबेरी, पीच आणि हापूस आंब्याच्या वाइनला विशेष प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे यातील स्ट्रॉबेरी वाइन महाबळेश्वर येथे लोकप्रिय झाली. महाबळेश्वर आणि स्ट्रॉबेरी हे समीकरण या वाइनलाही उपयोगी पडले. हे पाहून कंपनीने हापूस आंब्याच्या वाइनचे विपणन प्रामुख्याने कोकणात जाऊन केले. बाहेरून सुट्टीसाठी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांनी ही वाइन उचलून धरली. जास्त अल्कोहोल असलेली पेये (हार्ड लिकर) ज्यांना नको असतात आणि तरीही नवीन काहीतरी चाखून पाहायचे असते त्यांना ही वाइन आवडते.

कंपनीने प्रथम ‘अरुणाचल प्रदेश हॉर्टिकल्चर बोर्ड’बरोबर ‘ऱ्हिदम’ने किवी फळाची वाइन बनवली होती. अरुणाचलमध्ये किवी फळे मोठय़ा प्रमाणावर होतात. तिथून ती पुण्यात आणली जात आणि इथे वाइन बनत असे. पुढे अरुणाचल प्रदेशची राजकीय परिस्थिती बदलली, परंतु अजूनही ही वाइन बनते.

सुरुवातीला नऱ्हेमधील त्यांच्या वाइनरीची वार्षिक क्षमता ५ हजार लीटर होती. आता ती ३५ हजार लीटर आहे. लवकरच तळेगाव येथे लहान वाइनरी आणि पर्यटकांसाठी ‘वाइन टेस्टिंग’ कॅफे सुरू करण्याचा त्यांचा मनोदय आहे. या वर्षी या वाइन्सचा कर्नाटक, दिल्ली आणि चंडीगढमध्ये पुरवठा सुरू होईल, तसेच युनायटेड किंग्डममध्ये हापूस आंब्याची वाइन पाठवणार असल्याचे प्रभुणे यांनी सांगितले. युरोपमधील भारतीय रेस्टॉरंट्समध्ये ही वाइन ठेवण्याचे त्यांचे नियोजन आहे.

sampada.sovani@expressindia.com

Story img Loader