|| राहुल खळदकर
स्वस्त धान्य दुकानातील तांदळाची काळय़ा बाजारात विक्री, ‘सीआयडी’कडून तपास सुरू
पुणे : कर्नाटकच्या शासकीय धान्य योजनेतील तांदळाची आफ्रिकेतील देशांमध्ये विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. कर्नाटकातील तांदूळ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) बंदरातून जहाजाने आफ्रिकेतील देशात पाठविण्यात येत होता. पनवेल, खोपोली तसेच पुण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) सुरू करण्यात आला आहे.
आफ्रिकेत पाठविण्यात येणाऱ्या बेकायदा तांदूळ विक्रीत व्यापारी, कर्नाटकातील शासकीय धान्य विक्री करणारे दुकानदार, दलाल, मालवाहतूकदार अशी मोठी साखळी गुंतलेली आहे. या प्रकरणात पनवेल, खोपोली तसेच पुण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पनवेल पोलीस ठाण्यात एक तसेच खोपोलीत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास करण्यात येत असल्याचे ‘सीआयडी’च्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले. पनवेल, खोपोलीतील गुन्ह्यात आतापर्यंत २५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात पनवेल, खोपोलीतील बडय़ा व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणातील काही आरोपींनी न्यायालायाकडून जामीनही मिळवला आहे.
पुण्यात जप्ती..
गेल्या महिन्यात १२ फेब्रुवारी रोजी पुणे-सोलापूर रस्त्यावर तीन ट्रक पकडण्यात आले होते. या ट्रकमधून ८०० क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला होता, तसेच ट्रकचालकांना अटक करण्यात आली होती.
कर्नाटकातील शासकीय धान्य योजनेतील तांदूळ अतिशय कमी दरात खरेदी करून तो आफ्रिकेतील देशात विक्रीस पाठविण्यात येत असल्याची माहिती तपासात मिळाली. आफ्रिकेतील देशात तांदळाची विक्री जादा दराने करण्यात येत असून पनवेल आणि खोपोली पोलीस ठाण्यात याप्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘सीआयडी’कडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. – पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी)