पुणे : नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला असून, सुरुवातीलाच दरांत १५ ते २० टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी असतानाही हंगामाच्या पहिल्या टप्यात ही स्थिती आहे. तांदळाची लागवड कमी झाली असून पाऊस कमी झाल्यानेही उत्पादनावर परिणाम झाला आहे.
गेल्या वर्षी काही राज्यांत तांदळाला दर चांगले मिळाले होते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी स्थानिक भागात मागणी असणाऱ्या तांदळाची लागवड केली. काही राज्यात पेरणी लवकर झाली. पाऊसही चांगला झाला. मात्र, काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने भाताचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा तांदळाच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीला तांदळाच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मार्केट यार्डातील जयराज ग्रुपचे संचालक तांदूळ व्यापारी धवल शहा यांनी दिली. यंदा मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ, विदर्भातील नागपूर, भंडारा परिसरातील कोलम तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात इंद्रायणी तांदाळाला प्रतिक्विंटल चार ते साडेचार हजार रुपये दर मिळाले होते. यंदा उत्पादन कमी झाल्याने साडेपाच ते साडेसहा हजार रुपये मिळत आहे. कोलम तांदळाला यंदा प्रतिक्विंटल साडेपाच ते साडेसहा हजार रुपये असे दर मिळाले आहेत. मध्यप्रदेशातील सुरती कोलम, एचएमटी कोलम तांदळाचे प्रतिक्विंटलचे दर सात ते साडेसात हजार रुपये आहेत.
हेही वाचा >>>सिंहगड घाट रस्त्यावर जीप उलटली; दहा पर्यटक किरकोळ जखमी
बासमतीही महागला
गेल्यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला बासमती तांदळाला डिसेंबर महिन्यात दहा ते अकरा हजार प्रतिक्विंटल दर मिळाला होता. यंदा तो साडेअकरा ते तेरा हजारांच्या घरात गेला आहे. पारंपरिक बासमतीच्या दरवाढीमुळे ११२१ बासमती, पुसा बासमती, बासमती तिबार, दुबार, मोगरा, बासमती तुकडा, कणी या प्रकारच्या तांदळाच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आंबेमोहोरचे दर स्थिर
मध्य प्रदेशात आंबेमोहोर तांदळाची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. गेल्या वर्षी आंबेमोहोराच्या दरात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली होती. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी अधिक लागवड केली. परिणामी यंदा आंबेमोहोरचे उत्पादन अधिक झाले असून दर गेल्या वर्षी एवढेच, साडेपाच ते साडेसहा हजारांच्या दरम्यान आहेत.
पावसामुळे सर्व प्रकारच्या तांदळाचे नुकसान झाले आहे. प्रतवारीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा प्रक्रिया केलेल्या स्टीम राइस या प्रकाराला मोठी मागणी आहे. बिगरबासमती तांदळाला मागणी वाढली आहे. हंगामाच्या सुरुवातीला सर्व प्रकारच्या तांदळाच्या दरात वाढ झाली आहे. – धवल शहा, तांदूळ व्यापारी, निर्यातदार, मार्केट यार्ड