उन्हाळी वाळवणाचं दृश्य आता फारसं कुठे बघायला मिळत नाही. जे काही लागेल ते दुकानातूनच आणलं जातं. अर्थात, त्यातही चोखंदळ ग्राहक चवीला आणि गुणवत्तेला महत्त्व देतातच. उन्हाळी पदार्थाच्या चवीचा विषय निघाला, की घरगुती स्वरूपात तांदळाच्या पापडय़ा करण्याच्या एका ठिकाणाचं चित्र डोळय़ांपुढे उभं राहतं..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील वाडय़ांमध्ये पूर्वी उन्हाळय़ात हमखास दिसणारं वाळवणाचं चित्र आता बघायला मिळत नाही. पापड, पापडय़ा, चिकोडय़ा, सांडगे, बटाटय़ाचा किस वगैरे अनेक गोष्टी उन्हाळय़ात वर्षभराच्या साठवणुकीसाठी तयार करून ठेवल्या जायच्या. वाडय़ांमध्ये उन्हाळी हंगामात तो एक मोठा सोहळाच असायचा. त्या वाळवणाची राखण करण्याची जबाबदारी वाडय़ातील मुला-मुलींकडे असायची. पण कधीकधी अन्य कोणी येऊन त्या ओल्या पापडांचा किंवा पापडय़ांचा आस्वाद घेण्याच्या आधीच राखणीला बसलेल्यांकडूनच काही गोष्टी फस्त व्हायच्या. वाडय़ातील तमाम महिला मंडळाची हे उन्हाळी पदार्थ करण्यासाठी कोण लगबग असायची. हे चित्र आता तसं अभावानंच कुठे कधी दिसतं. अशा वेळी मग साहजिकच आठवण होते ती घरगुती पद्धतीनं असे पदार्थ तयार करून देणाऱ्यांची. त्यातही अगदी आपल्या घरीच केले आहेत असे पदार्थ कोणी तयार करून देत असेल तर.. मग तर अशांकडे ग्राहक रांगाच लावतात.

एखाद्या पदार्थाला ग्राहकांकडून किती मागणी येऊ शकते याचं एक चांगलं उदाहरण बालाजीनगरमध्ये राहणाऱ्या वंदना घाटपांडे यांच्या घरी गेलं की बघायला मिळतं. उकडीचे मोदक आणि पोळय़ा पुरवणं हा तसा घाटपांडे यांचा वर्षभराचा व्यवसाय. पण उन्हाळय़ात त्यांच्या घरी धामधूम असते ती तांदळाच्या पापडय़ांची. पूर्वी घरोघरी तयार होणारा हा पदार्थ. मात्र आता त्यालाही मोठीच बाजारपेठ मिळत आहे. घाटपांडे यांनी दहा वर्षांपूर्वी एका उन्हाळय़ात तांदळाच्या पापडय़ा थोडय़ा अधिक प्रमाणात तयार केल्या आणि त्यांच्याकडे येणाऱ्या नेहमीच्या ग्राहकांना दाखवल्या. पहिल्याच वर्षी पापडय़ा लोकांना खूप आवडल्या आणि तेव्हापासून दर उन्हाळय़ात शब्दश: हजारो पापडय़ा तयार करून त्यांची विक्री सुरू झाली.

फेब्रुवारी महिना सुरू झाला की या उन्हाळी पापडय़ांची तयारी घाटपांडे यांच्या घरी सुरू होते आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात प्रत्यक्ष पापडय़ा तयार करण्याचं काम सुरू होतं. पुढे मे अखेपर्यंत हा कारखाना सुरू असतो. ही पापडय़ा तयार होण्याची प्रक्रिया घाटपांडे यांच्या घरात आपल्याला केव्हाही बघता येते. उत्तम प्रतीच्या तांदळाची खरेदी हा या प्रक्रियेतील पहिला टप्पा. पापडय़ा तयार करण्यापूर्वी तांदूळ तीन दिवस भिजत ठेवले जातात. पापडय़ा पांढऱ्या स्वच्छ होण्यासाठी तांदूळ धुऊन घेण्याची प्रक्रिया महत्त्वाची असते. रोज पाणी बदलावं लागतं. त्यानंतर हे भिजवलेले तांदूळ थोडा वेळ चाळणीत पसरून ठेवले जातात आणि नंतर ते मिक्सरमधून काढून त्याचं पीठ तयार केलं जातं. तयार पीठ चाळून झालं की ते भिजवण्यासाठी सिद्ध होतं. पापडय़ा तयार करायला घेण्यापूर्वी हे पीठ पाण्यात भिजवून पातळ केलं जातं आणि नंतर ते ताटल्यांवर सोडलं जातं. त्या ताटल्या पापडय़ा तयार करण्याच्या पात्रात (स्टँडमध्ये) ठेवून पापडय़ा उकडून घेतल्या जातात आणि नंतर त्या वाळवण्याची प्रक्रिया सुरू होते. आधी त्या पंख्याखाली वाळवल्या जातात आणि नंतर पाच-सात मिनिटं उन्हात वाळवल्या जातात. एकदा उन्हात वाळवून झाल्या की ही सगळी प्रक्रिया पूर्ण होते. या पापडय़ा थेट उन्हात वाळवल्या तर त्यांचे तुकडे पडतात. त्यामुळे वाळवण सुरू असतानाही सतत काळजी घ्यावी लागते.

या वाळलेल्या तांदळाच्या पापडय़ा कढईतील गरम तेलात सोडायचाच अवकाश.. पापडी मस्त फुलून येते. चवीसाठी एक तुकडा तोंडात टाकला की घरगुती पदार्थाची चव म्हणजे काय हे नकळतच आपल्याला समजतं. वंदना घाटपांडे यांना या व्यवसायाचा दहा वर्षांचा अनुभव असल्यामुळेच त्या दरवर्षी हजारो पापडय़ा तयार करू शकतात आणि त्यांना तेवढी मागणीही दरवर्षी असते. शिवाय, मुलगा आदित्य यालाही पदार्थ तयार करण्याची आवड असल्यामुळे त्याचीही मोलाची मदत त्यांना होते. उन्हाळय़ात तयार होणाऱ्या अशा पदार्थाची साठवण करायलाच हवी.

कुठे आहे?

  • वंदना घाटपांडे बालाजीनगर, द्वारकाधीश अपार्टमेंट, सदनिका क्रमांक १५, दुसरा मजला
  • संपर्क : ९०११६२९१५३
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rice papad pune summer season