आता महाविद्यालयीन विद्यार्थी अभ्यासाबरोबरच भातलावणीही करणार आहेत. वनराई संस्थेच्या ‘अमृतवर्ष महोत्सवा’अंतर्गत ‘एक दिवस भातशेतीसाठी-शेतक ऱ्यांच्या मदतीसाठी’ ही चळवळ राबवण्यात येणार आहे. १३ ते २३ जुलै या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या चळवळीत तब्बल पंचावन्न हजार विद्यार्थी सहभागी होणार असून ते साडेपाच हजार एकर क्षेत्रावर भातलावणी करणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन धारिया आणि अॅड. नंदू फडके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
फडके म्हणाले, ‘‘प्रत्येक शहरी व्यक्तीने एक दिवस शेतात काम केल्यास शेतीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न सुटू शकेल. मागील वर्षीही या प्रकारचा उपक्रम संस्थेतर्फे राबवण्यात आला असून त्या वेळी विद्यार्थ्यांच्या मदतीमुळे शेतक ऱ्यांचे भाताचे उत्पादन २६ टक्क्य़ांनी वाढले होते. या वर्षी अनेक महाविद्यालयांनी या चळवळीत सहभाग नोंदवला आहे. पुढील वर्षी गणेश मंडळांनीही चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे.’’
विंझर, मालवली, दापोडे, लाशीरगाव, खांबवडी, मार्गासनी या ठिकाणी सतराशे एकर, सोंडे, वडगांव, अस्नी, भागीनघर, करंजवणे, अक्सवाडी, अंबवणे येथे नऊशे एकर, वागणी, कोळवडी, कातवडी, मांगदरी, निगडे, येथे एकोणीसशे एकर, वाजेघर, लावी, चिरमोडी, पिंपरी, खोंडवली, वांजळे, खरीव, गुंजवणे, साखर, घवर येथे ९७५ एकर आणि वेल्हा खुर्द व बुद्रुक, कोंढवले, खोदाद, हिरपोडी, विहीर, अंत्रोली, पाबे या गावांमध्ये चौदाशे एकर शेतीत ही भातलावणी करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा