दोनदा वाढवून दिलेल्या मुदतीनंतरही मीटरचे कॅलिब्रेशन न झालेल्या काही रिक्षा अद्यापही रस्त्यावर धावत आहेत. या रिक्षांची भाडेआकारणी मीटरनुसार नव्हे, तर भाडेपत्रकानुसार करण्यात येत असल्याचे प्रवासी व रिक्षा चालकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा रिक्षांबाबत कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने १५ ऑक्टोबरला रिक्षाला भाडेवाढ दिली. भाडेवाढीबरोबरच या वेळी रिक्षाचा पहिला टप्पा एक किलोमीटरवरून दीड किलोमीटरचा करण्यात आला. त्यामुळे रिक्षाच्या मीटरचे कॅलिब्रेशन करून घेण्याचा विषय आला. मात्र, सुरुवातीपासून कॅलिब्रेशनबाबत विविध वाद निर्माण झाल्याने अनेक रिक्षा चालकांनी कॅलिब्रेशनच्या प्रक्रियेकडे पाठ फिरविली होती. सुरुवातीला कॅलिब्रेशन करण्यासाठी ४५ दिवसांची मुदत देण्यात आली. या मुदतीतही अनेक रिक्षा मीटरचे कॅलिब्रेशन न झाल्याने ही मुदत एक महिन्याने वाढविण्यात आली. वाढीव मुदत ३१ डिसेंबरला संपली. मात्र, दुसरी मुदत संपूनही अनेक रिक्षांच्या मीटरचे कॅलिब्रेशन झाले नसल्याचे लक्षात आल्यानंतर आरटीओने दिलेल्या आकडेवाडीनुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुन्हा दहा दिवसांची मुदतवाढ दिली. ही मुदत १० जानेवारीला संपली. त्यानंतरही अनेक रिक्षा मीटरचे कॅलिब्रेशन झाले नाही. मुदत संपल्यानंतर कॅलिब्रेशनला येणाऱ्या रिक्षा चालकाला दंड करण्यात येत आहे. मात्र सध्या कॅलिब्रेशनशिवाय रस्त्यावर धावत असलेल्या रिक्षांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.

Story img Loader