पुणे : दुचाकी पुढे नेताना झालेल्या वादातून रिक्षाचालकाने दुचाकीस्वार निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगठ्याचा चावा घातला. रिक्षाचालकाने जोरात चावा घेतल्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या बोटाचा भाग तुटून पडला. रविवार पेठेत ही घटना घडली.
याप्रकरणी रिक्षा चालक गणेश सोमनाथ भुसावळकर (वय ६०, रा. हेरंब काशीनाथ सोसायटी, धनकवडी, बालाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानेश्वर खंडू बेंद्रे (वय ६६, रा. अयोध्यानगरी, प्रगतीनगर, बोपोडी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्ञानेश्वर बेंद्रे पोलीस दलातून निवृत्त झाले आहे. ते रविवार पेठेतून पत्नीसह दुचाकीवरुन निघाले होते. रविवार पेठेत गृहोपयोगी साहित्य खरेदीसाठी आले होते.
हेही वाचा…राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारात वाढ; मुंबई, ठाण्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद
रविवार पेठेतील राजहंस मेटल दुकानासमोरून दुचाकी त्यांनी काढली. त्यावेळी रिक्षाचालक गणेश भुसावळकरला थांबावे लागले. या कारणावरून आरोपी भुसावळकरने बेंद्रे यांना शिवीगाळ केली. ‘पुण्यात येतात आणि गाड्या आडव्या घालतात’ असे भुसावळकर त्यांना म्हणाला. बेंद्रे यांनी त्याला जाब विचारला. आरोपीने त्यांचा शर्ट पकडून धक्काबुक्की केली. बेंद्रे यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा जोरात चावा घेतला. बेंद्रे यांच्या अंगठ्याचा नखाजवळ असलेला भाग तुटून पडला. बेंद्रे यांच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली असून, महिला पोलीस हवालदार पारखे करत आहेत.