राज्य शासनाकडून वजने-मापे विभागाकडे सीएनजीबाबत अद्यापही मानके आली नसल्याने सीएनजी पुरवठय़ाच्या वजनांचे प्रमाणीकरणच होऊ शकले नसल्याची बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे सीएनजी भरताना रिक्षा चालकांची फसवणूक होत असल्याचा आरोप रिक्षा पंचायतीच्या वतीने करण्यात आला आहे.
पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांनी याबाबतची माहिती दिली. सीएनजीच्या रिक्षाच्या टाकीमध्ये साडेचार किलोपेक्षा जास्त गॅस बसत नाही. मात्र, बुधवारी नरवीर तानाजीवाडी येथील सीएनजीच्या पंपावर दोन रिक्षा चालकांच्या टाकीमध्ये अनुक्रमे ५.३० किलो व ४.२१ किलो सीएनजी भरल्याची नोंद पंपाच्या मीटरवर आली. पंपावर येण्यापूर्वी दोन्ही रिक्षांमध्ये सुमारे एक किलो गॅस होता. त्यामुळे या रिक्षा चालकांची फसवणूक झाली असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. याबाबत संबंधित पंपचालक व यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
संबंधित प्रकरणामध्ये कारवाई करण्याबाबत वजने-मापे यांच्या विभागाकडे रिक्षा पंचायतीच्या वतीने संपर्क करण्यात आला. मात्र, सीएनजी पुरवठय़ाबाबत वजने प्रमाणीकरणच झाले नसल्याचे याच विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे याबाबतच्या तक्रारीवर या विभागाला कारवाई करता येत नसल्याचेही वजने-मापे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले, असे पवार यांनी सांगितले.