हकीम समितीच्या सूत्रानुसार सध्या रिक्षाची भाडेवाढ करणे शक्य नसल्याने प्रतीक्षाशुल्कामध्ये छुपी दरवाढ मागण्यात येत असल्याचा आरोप प्रादेशिक परिवहन कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत सामाजिक संस्थांनी केला. पुण्यात कोणत्याही प्रकारे रिक्षाला भाडेवाढ देऊ नये, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
रिक्षा चालकांकडून दरवाढ व मीटरच्या प्रतीक्षाशुल्काचा कालावधी कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर सामाजिक संस्थांची बाजू समजून घेण्याच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. सामाजिक संस्थांच्या वतीने सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे, नागरिक चेतना मंचचे मेजर जनरल (निवृत्त) जठार, पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी यांनी याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन दिले आहे.
इतर शहराच्या तुलनेत पुण्यात रिक्षाचे दर अगोदरच जास्त असल्याने कोणत्याही पद्धतीने दरवाढ देऊ नये. हकीम समितीच्या सूत्रानुसार भाडेवाढीमध्ये प्रतीक्षाशुल्कात आपोआपच वाढ होत असते. त्यामुळे दरवाढीची वेळ आली नसतानाही प्रतीक्षाशुल्कात वाढ करणे चुकीचे आहे. प्रतीक्षाशुल्कात इंधन जळणे इतकाच खर्च असतो. तो प्रतिकिलोमीटरला तीन रुपयांपेक्षा जास्त येत नाही. सध्या प्रतीक्षाशुल्कासाठी प्रतिकिलोमीटर एक रुपया अधिभार ग्राहकांना द्यावा लागतो. त्यामुळे त्यात वाढ करण्याचे कोणतेही कारण नाही, असे निवेदनात म्हटले आहे. रेल्वे, एसटी, पीएमपीमध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग व अंध प्रवाशांना भाडय़ात सवलत दिली जाते. त्यानुसार ही सवलत रिक्षाच्या भाडय़ातही द्यावी. अशा प्रवाशांसाठी पहिल्या टप्प्याचे भाडे १२ रुपये करून नवे भाडेपत्रक करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw fare hike hidden