प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षाला भाडेवाढ दिली. एक जुलैपासून नवे भाडे लागूही करण्यात आले. मात्र, प्रवाशांच्या माहितीसाठी अद्यापही नवे भाडेपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावरून भाडेपत्रक ‘डाऊनलोड’ करण्याची व्यवस्था आहे. मात्र, त्या ठिकाणीही अद्याप जुनेच भाडेपत्रक झळकते आहे. प्राधिकरणाने भाडेवाढीची तत्परता दाखविली असली, तरी प्रवाशांसमोर नवे भाडेपत्रक आणण्यास मात्र तितकी तत्परता दाखविली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रिक्षाची किंमत, इंधनाच्या दरातील वाढ, सुटय़ा भागांची किंमत, महागाई निर्देशांक आदी गोष्टींचा आढावा घेऊन रिक्षाचे भाडे ठरविणाऱ्या हकीम समितीच्या सूत्रानुसार पुणे व िपपरी-चिंचवड विभागात धावणाऱ्या रिक्षांसाठी परिवहन प्राधिकरणाने भाडेवाढ दिली. नव्या भाडेपत्रकानुसार आता रिक्षाच्या प्रवाशाला पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी १७ रुपयांऐवजी १८ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी ११.६५ रुपयांऐवजी १२.३१ रुपये द्यावे लागतील.
सध्या रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर असल्याने वाढीव भाडय़ाचे दरपत्रकाचे सॉफ्टवेअर मीटरमध्ये टाकून घेण्याची अर्थातच प्रमाणीकरणाची (क्रॅलिब्रेशन) प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे. मीटरचे प्रमाणीकरण करून घेतल्याशिवाय रिक्षा चालकांना नवे भाडे आकारता येणार नाही. त्यामुळे ही प्रक्रिया वेगाने होण्यासाठी रिक्षा संघटनांकडून त्यात लक्ष घालण्यात येत आहे. रिक्षा भाडेवाढ तत्परतेने झाली असली, तरी पहिल्या दिवशी प्रवाशांसाठीच नव्हे, तर भाडेवाढीचे सॉफ्टवेअर टाकून देण्यासाठीही नवे भाडेपत्रक तयार नव्हते. रिक्षाच्या मीटरमध्ये भाडे दिसत असले, तरी प्रत्यक्ष द्यायची रक्कम काही पैशांची कमी-अधिक असते. दरवाढ झाल्यानंतर प्रवाशांसाठीही भाडेपत्रक प्रसिद्ध करण्यात येते. मात्र, यंदा भाडेवाढ होऊन सहा दिवस उलटले असले, तरी कोणत्याही माध्यमातून प्रवाशांसाठी भाडेपत्रकाची प्रसिद्धी करण्यात आलेली नाही. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर २०१३ मधील जुनेच भाडेपत्रक दिसते आहे. अगदी एका क्लिकवर हे भाडेपत्रक बदलणे शक्य असतानाही तितकीही तसदी घेतली जात नसल्याबद्दल प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2015 रोजी प्रकाशित
रिक्षाचे नवे भाडेपत्रक आहे कुठे?
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षाला भाडेवाढ दिली. एक जुलैपासून नवे भाडे लागूही करण्यात आले. मात्र, प्रवाशांच्या माहितीसाठी अद्यापही नवे भाडेपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 07-07-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw fare hike rto rate card