शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पुणे व िपपरी-चिंचवडमध्ये ३,२०८ नवे रिक्षा परवाने देण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांतच शहराच्या रस्त्यावर या नव्या रिक्षा उतरणार आहेत. रिक्षा वाहतुकीची सद्य:स्थिती व शहरात झपाटय़ाने वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे निर्माण झालेली वाहतूक समस्या पाहता वाढीव रिक्षा नागरिकांसाठी सोय ठरणार की समस्या, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. सीएनजी इंधन पुरवठय़ाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. नव्या रिक्षांची भर पडल्यानंतर या इंधनाच्या पुरवठय़ावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे व िपपरी-चिंचवड शहरात सध्या पन्नास हजारांच्या आसपास रिक्षा आहेत. रिक्षांची संख्या वाढविण्याबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सध्या नवे परवाने देण्यात येत आहे. परवान्यासाठी अर्जदारांमधून लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. या अर्जदारांच्या भाषेची चाचणी व कागदपत्रांची पडताळणी करून अनेकांना परवान्याचे इरादापत्रही देण्यात आले आहेत. शहरात लोकसंख्येनुसार रिक्षांचे परवाने वाढविण्याच्या धोरणानुसार हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात शहरातील वाहतुकीची स्थिती लक्षात न घेताच हा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. आहे त्या रिक्षा चालकांच्या व्यवसायावर या नव्या रिक्षांमुळे परिणाम होण्याची शक्यता असल्याने काही रिक्षा संघटनांनीही शासनाच्या या निर्णयाला विरोध केला होता.
शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यात नव्या रिक्षांची भर पडल्यास वाहतूक समस्येतही भर पडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरात खरोखरच नव्या रिक्षांची आवश्यकता आहे का, याबाबत शासनाने आढावा घेतला होता का किंवा प्रवाशांकडून त्याबाबतची मागणी झाली होती का, असे प्रश्नही सध्या विचारण्यात येत आहे. नव्या रिक्षा सीएनजी इंधनावरील असणार आहेत. शहरामध्ये अजूनही पुरेशा प्रमाणात सीएनजीचे पंप उपलब्ध झालेले नाहीत. दुसरीकडे मोठय़ा प्रमाणावर रिक्षा सीएनजीवर परावर्तित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सीएनजीचा पुरवठा अनेकदा कमी पडतो. नव्या रिक्षांची भर पडल्यानंतर सीएनजीबाबतही समस्या निर्माण होऊ शकते.
शहराच्या काही भागात रिक्षा मिळत नाहीत. अनेक ठिकाणी मीटरनुसार रिक्षा धावत नाहीत. काही वेळेला भाडे नेण्यास नकारही दिला जातो. नव्या रिक्षा आल्याने या समस्या सुटतील का, असाही प्रश्न प्रवाशांकडून केला जात आहे. त्यामुळेच नव्या रिक्षांमुळे सोय होणार की समस्येत आणखी भर पडणार, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
रिक्षा थांबे आणि वाहतूक कोंडी
वाहतुकीला अडथळा होऊ नये व रस्त्यालगत नागरिकांना रिक्षाही उपलब्ध व्हावी, असे धोरण ठेवून चार वर्षांपूर्वी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण व महापालिकेच्या नियोजनानुसार शहरात रिक्षांचे थांबे ठरविण्यात आले होते. या थांब्यांवर रिक्षांची संख्याही ठरवून देण्यात आली होती. मात्र, पुढील काही दिवसांतच हे थांबे बंद पडून रिक्षा चालकांनी पुन्हा वाहतुकीला कोंडी निर्माण करणाऱ्या अनधिकृत थांब्यांवर रिक्षा थांबविणे सुरू केले आहे. आता नव्याने येणाऱ्या तीन हजारांहून अधिक रिक्षाही याच अनधिकृत थांब्यांवर उभ्या केल्या जाणार असल्याने थांब्यांमुळे होणाऱ्या वाहतुकीच्या अडथळ्यातही भर पडण्याची शक्यता आहे.
वाढीव रिक्षा परवाने सोय की समस्या?
रिक्षा वाहतुकीची सद्य:स्थिती व शहरात झपाटय़ाने वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे निर्माण झालेली वाहतूक समस्या पाहता वाढीव रिक्षा नागरिकांसाठी सोय ठरणार की समस्या...
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-03-2016 at 03:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw licenses facilitate problem