दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहनांची संख्या, वाहतुकीचे नियम न पाळण्यातच धन्यता मानणारे काही वाहनचालक अन् वाहतूक विभाग तसेच स्थानिक प्रशासनाची सुस्त भूमिका, या अतूट समीकरणामुळे सध्या पुण्याच्या रस्तोरस्ती वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने वाहतुकीचे वाटोळे करण्यामध्ये ‘वाटा’ उचलतो आहे. रिक्षा चालकही त्यात मागे नाही. मुख्य व गर्दीच्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी दोन वर्षांपूर्वी रिक्षांसाठी योग्य ठिकाणी अधिकृत थांबे देण्यात आले आहेत. रिक्षा थांब्यांची मक्तेदारी संपून कोणालाही कुठल्याही थांब्यावरून व्यवसाय करता येईल, अशी संकल्पनाही त्या मागे ठेवण्यात आली होती. प्रत्यक्षात सध्या मात्र हे अधिकृत रिक्षा थांबे ओस पडलेले दिसतात व ‘पहिले पाढे पंचावन्न’नुसार वाहतुकीचे वाटोळे करण्यासाठी काही रिक्षा थांबे पुन्हा कार्यरत झाले आहेत.
रिक्षा थांब्यांमुळे रस्त्याला होणारा अडथळा लक्षात घेता, अशा थांब्यांवर कारवाई करण्यापूर्वी रिक्षा चालकांना व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतला होता. त्यानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व थांब्यांचा अभ्यास करण्यात आला. मुख्य रस्त्याच्या आतील गल्लीत किंवा रस्त्याच्या काहीसे बाजूला असणाऱ्या जागा शोधण्यात आल्या. रिक्षा संघटनांचाही या प्रक्रियेत सहभाग होता. त्यानुसार अधिकृत रिक्षा थांबे देण्यात आले. त्या ठिकाणी पालिकेच्या वतीने फलकही लावण्यात आले. त्यावर रिक्षांची संख्या व तक्रारीसाठी विविध क्रमांकही नोंदविण्यात आले.
अधिकृत महापालिकेचे रिक्षा थांबे झाल्याने खासगी रिक्षा थांब्याचे अस्तित्व संपुष्टात आणण्यात आले होते. त्यामुळे कोणताही रिक्षा चालक शहरातील कोणत्याही रिक्षा थांब्यावर थांबू शकणार होता. मात्र, प्रशासनाने याबाबत प्रथमपासूनच ढिलाईची भूमिका घेतली. त्यामुळे सध्या अधिकृत रिक्षा थांबे सतत ओस पडलेले दिसतात. रिक्षा चालकांकडून पूर्वीचेच थांबे पुन्हा निर्माण केले गेले. त्यामुळे प्रत्येक थांब्यावर ठराविक रिक्षा चालकांची मक्तेदारी कायम राहण्याबरोबरच काही भागात वाहतुकीची कोंडीही कायम राहिली.
रिक्षा थांबे अन् मंदिरे.. एक गुपित
एखादी नवी वस्ती निर्माण झाली की हळूहळू त्या वस्तीजवळील रस्त्यावर रिक्षा थांबू लागतात. काही दिवसानंतर काही ठराविक रिक्षा चालकांचीच तेथे मक्तेदारी होते व त्यातून निर्माण होतो खासगी रिक्षा थांबा. अर्थातच हा थांबा अनधिकृत जागेवर उभारलेला असतो. त्यानंतर रिक्षा थांब्याचा फलक, त्या थांब्याची कार्यकारिणी आदी सर्व सोपस्कर होतात. हा थांबा रस्त्याचा काही भाग आडवित असतो. त्यानंतर अचानक एकेदिवशी थांब्याच्या जवळ छोटेसे कच्चे मंदिर उभे राहते अन् बघताबघता मंदिराचे बांधकाम पक्के होते व तिथे नियमित आरती, पूजाही होऊ लागतात. अशा पद्धतीने बहुतेक रिक्षा थांब्यांवर मंदिरांची निर्मिती झाली आहे. हे अतिक्रमण असले, तरी मंदिर तेथून हलविले जात नाही व त्यामुळे रस्त्याला अडथळा करणारा थांबाही तेथेच राहतो…

Story img Loader