किरकोळ खरेदीला जाणे, मुलांना शाळेत सोडायला जाणे किंवा आप्तेष्टांना भेटायला जाणे अशा कामांसाठी रिक्षाचा वापर करण्यास प्राधान्य देणाऱ्या पुणेकरांपुढे आता टॅक्सीचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. लहान अंतरांसाठी ग्राहकांनी टॅक्सीचा वापर करावा यासाठी टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्या सरसावल्या आहेत. विविध टॅक्सी ऑपरेटर्समार्फत टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ‘टॅक्सी फॉर शुअर’ या संकेतस्थळाने ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी नुकतेच लहान अंतरांसाठीच्या टॅक्सी प्रवासाचे भाडे कमी करण्याची शक्कल लढवली आहे.
टॅक्सी म्हणजे लांबच्या अंतरांसाठीचे वाहन किंवा टॅक्सी म्हणजे महागडा प्रवास हा समज पुसून काढून प्रवाशांना आकर्षून घेण्यासाठी या संकेतस्थळाने पहिल्या १५ किमी अंतरांसाठीचे टॅक्सीभाडे सुमारे २५ टक्क्य़ांनी कमी केले आहे. त्यामुळे आता ४ किमी अंतरांपर्यंतचा प्रवास केवळ ४९ रुपयांत वातानुकूलित टॅक्सीतून करता येणार आहे. कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अरविंद सिंघल म्हणाले, ‘‘केवळ लांबच्या अंतरांसाठीच नव्हे, तर रोजच्या प्रवासासाठीही टॅक्सी वापरण्यास ग्राहकांनी प्राधान्य द्यावे या विचारातून आम्ही टॅक्सी भाडे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी ० ते १० किमीपर्यंतच्या प्रवासासाठीचे टॅक्सीभाडे आम्ही २०० रुपये ठेवले होते. हे भाडे आता पहिल्या ४ किमीसाठी ४९ रुपये असे आकारण्यात येणार आहे. त्यामुळे लहान अंतरांसाठीचा प्रवास ग्राहकांना परवडणाऱ्या दरात होऊ शकेल. शॉपिंग मॉलमध्ये जाणे, ज्येष्ठ नागरिकांना किंवा लहान मुलांना इच्छित स्थळी सोडणे, जिमला जाणे अशा रोजच्या कामांसाठीही टॅक्सीचा वापर व्हावा असा उद्देश यामागे आहे.’’
पुण्यात ‘टॅक्सी फॉर शुअर’ संकेतस्थळामार्फत टॅक्सी सेवा देणारे ३५ टॅक्सी ऑपरेटर्स असून याअंतर्गत सध्या पुण्याच्या रस्त्यांवर ४०० टॅक्सी धावतात. सप्टेंबरच्या अखेरीस या संकेतस्थळाने पुण्यात सेवा देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे १० हजार पुणेकरांनी टॅक्सी सेवा वापरली असल्याची माहिती कंपनीच्या कनिका कालरा यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2014 रोजी प्रकाशित
रिक्षाला टॅक्सीचा पर्याय देण्यासाठी कंपन्या सरसावल्या!
किरकोळ खरेदीला जाणे, मुलांना शाळेत सोडायला जाणे किंवा आप्तेष्टांना भेटायला जाणे अशा कामांसाठी रिक्षाचा वापर करण्यास प्राधान्य देणाऱ्या पुणेकरांपुढे आता टॅक्सीचाही पर्याय उपलब्ध झाला आहे.
First published on: 06-11-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw taxi substitute fare