पुणे : नवी दिल्लीतील भारतमंडपम् येथे ‘जी-२०’च्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेप्रसंगी ‘कल्चरल कॉरिडॉर’ या प्रदर्शनात भारतातर्फे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील ऋग्वेदाचे हस्तलिखित ठेवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात प्रत्येक देशाकडून राष्ट्रीय महत्त्वाच्या दोन वस्तू मांडण्यात येणार आहेत. भांडारकर संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन म्हणाले, संस्थेतील हे काश्मिरी भूर्जपत्रातील ऋग्वेदाचे हस्तलिखित सुमारे ५०० वर्षांपूर्वीचे असून शारदा लिपीत लिहिलेले आहे.
हेही वाचा >>> पुणे – नगर रस्त्यावर शिरुरजवळ टेम्पोची मोटारीला धडक; दोन महिलांसह तिघांचा मृत्यू, तीन जण जखमी
जॉर्ज ब्यूहर या विद्वानाने ते १८७५ मध्ये मिळवले. ऋग्वेदाच्या अतिशय जुन्या आणि शुद्ध हस्तलिखितांपैकी ते एक मानले जाते. त्याचा उपयोग ऋग्वेदाच्या संशोधनाला मोठ्या प्रमाणात झालेला आहे.’’ ऋग्वेदासह दिल्लीच्या लालबहादूर शास्त्री विद्यापीठामध्ये असणारे पाणिनीच्या अष्टाध्यायीचे हस्तलिखितही या प्रदर्शनामध्ये सांस्कृतिक ठेवा म्हणून ठेवण्यात येणार आहे. भांडारकर संस्थेच्या असिस्टंट क्युरेटर डॉ. अमृता नातू आणि संशोधन सहायक बाळकृष्ण जोशी यांना ही ऋग्वेदाची प्रत दिल्लीला प्रदर्शनाच्या संयोजकांकडे सुपूर्द केली. संयोजकांतर्फे राष्ट्रीय हस्तलिखित मिशनचे संचालक डॉ. अनिर्वाण दाश यांनी हे हस्तलिखित स्वीकारले. प्रदर्शनानंतर हे हस्तलिखित भांडारकर संस्थेला परत करण्यात येईल. या प्रदर्शनामध्ये इंग्लंडची प्रसिद्ध मॅग्ना चार्टा (मोठी सनद), अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा, आफ्रिकेतील प्रागैतिहासिक मानवाचे अवशेष आदी महत्त्वाच्या वस्तू पाहता येणार आहेत.