माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे ‘वस्त्रहरण’ केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पक्षवर्तुळात तीव्र अस्वस्थता दिसून आली. लगेचच प्रत्युत्तर न देता अजितदादांच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देऊ, अशी भूमिका आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेतली. तर, आपणही बारामतीकर असून ‘ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी’, असे सांगत खासदार अमर साबळे यांनी वेळप्रसंगी अजितदादांना ‘अरे ला का रे’ने उत्तर देऊ, असा इशारा दिला.
शहराध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आमदार जगताप प्रथमच पक्ष कार्यालयात आले, तेव्हा माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी स्वागत केले. त्यानंतर, जगतापांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अजित पवार यांनी काल भाजपवर विशेषत: जगताप यांच्यावर केलेल्या टीकेचे सावट बैठकीवर होते. िपपरीत राष्ट्रवादीला हद्दपार करून भाजपची सत्ता आणण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते, ते पूर्ण करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. साबळे, जगताप, खाडे यांच्यासह एकनाथ पवार, महेश कुलकर्णी, उमा खापरे यांनी मनोगत व्यक्त केले. राजू दुर्गे यांनी सूत्रसंचालन केले. अमोल थोरात यांनी आभार मानले.

Story img Loader