विद्याधर कुलकर्णी
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून त्यांचा अपमान करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. सात दिवसांमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची माफी मागितली नाही तर, पडळकर यांच्याविरुद्ध न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी दावा दाखल करण्याचा इशारा या नोटीशीतून देण्यात आला आहे.यादव यांनी अॅड. असीम सरोदे, अॅड. श्रीया आवले, अॅड. बाळकृष्ण निढाळकर, अॅड. अवंती जायले यांच्यामार्फत पडळकर यांना नोटीस बजावली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून अनेक नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. पडळकर हे जाणुनबुजून पवार कुटुंबीयांबाबत सातत्याने बेताल वक्तव्ये करतात. निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणाऱ्या पडळकर यांनी विचारशून्य व्यक्ती असल्याचे सिद्ध केले आहे. पवार कुटुंबीयांबाबत सातत्याने बेताल वक्तव्य करणाऱ्या पडळकर यांनी सात दिवसांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांची स्वतंत्रपणे लेखी माफी मागावी. अन्यथा त्यांच्यावर दिवाणी, फौजदारी, अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा या नोटीशीमध्ये देण्यात आला आहे. तसेच, निवडणूक आयोगात खोटी माहिती दिल्याप्रकरणी खटला दाखल करण्याचा इशाराही पडळकर यांना देण्यात आला आहे.