रिक्षा प्रवासाचे भाडे आता एसएमएस बँकिंगनेही देता येणार आहे. यासाठी प्रवाशांना आपल्या मोबाईलवर एक विशिष्ट अॅप डाऊनलोड करावे लागणार असून रिक्षाचालकाकडे स्मार्टफोन नसला तरी त्याच्या बँक खात्यात एसएमएस बँकिंगद्वारे थेट पैसे जमा होऊ शकणार आहेत.  
रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार आणि ‘एम सिक्के’ या अॅपचे निर्माते विभव केळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.  
अॅपवरुन रिक्षाभाडे देण्यासाठी प्रवाशाने ‘एम सिक्के’ हे अॅप आपल्या स्मार्टफोनवर डाऊनलोड करायचे आहे. या व्यवहारात रिक्षाचालकाकडे स्मार्टफोन नसला तरी चालणार आहे. साधा मोबाईल बाळगणाऱ्या रिक्षाचालकाने या अॅपचे २- डी बारकोड कार्ड रिक्षात ठेवायचे आहे. रिक्षाचा प्रवास पूर्ण झाल्यावर प्रवासी या अॅपचा वापर करुन रिक्षाचे भाडे देऊ शकेल. त्यासाठी इंटरनेटची गरज नाही. भाडे देण्याच्या वेळी प्रवासी आपल्या फोनवर रिक्षाचालकाकडील बारकोडचा फोटो काढेल आणि झालेल्या रिक्षाभाडय़ाची रक्कम फोनमध्ये टाईप करेल. एका क्लिकवर रिक्षा भाडय़ाची रक्कम प्रवाशाच्या बँक खात्यातून रिक्षाचालकाच्या बँक खात्यात जमा होईल. बँकेत रक्कम जमा झाल्याचा एसएमएस देखील रिक्षाचालकाच्या मोबाईलवर क्षणार्धात पाठवला जाईल. १२ जूनला सायंकाळी ५.३० वाजता रिक्षा पंचायतीच्या कार्यालयात या प्रणालीसाठी रिक्षाचालकांची नोंदणी करण्यास सुरूवात होणार असून त्यांना बारकोडचे कार्ड मोफत देण्यात येईल.
केंद्र सरकारच्या ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’कडून (एनपीसीआय) ‘इमिजिएट पेमेंट सव्र्हिस’ (आयएमपीएस) ही सेवा पुरवली जाते. या सेवेचा वापर या अॅपमध्ये केला आहे. आयएमपीएसमध्ये सहभागी असलेल्या बँकांचे खातेदार या योजनेचा वापर करु शकतील, असेही सांगण्यात आले. अधिक माहितीसाठी या  msikkay@gmail.com ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा.

Story img Loader