प्रवासी वाहतुकीतील वाहन किती वर्षे रस्त्यावर धावू शकते, याचे काही शास्त्रीय ठोकताळे निश्चित करून त्या वाहनाचे आयुष्य ठरविले जाते. पुणे शहरामध्ये रिक्षाचे आयुष्य वीस वर्षे ठरविण्यात आले आहे. मात्र, त्यात वाढ करण्याची मागणी करून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या रिक्षा चालकांची निराशा झाली असून, रिक्षाचे आयुष्य वीसच वर्षे राहील यावर प्राधिकरण ठाम राहिले आहे. त्यामुळे नव्या वर्षांमध्ये शहरातील चार हजारांहून अधिक रिक्षा भंगारात जाणार आहेत.
मुंबई विभागात रिक्षांचे आयुष्य पंधरा वर्षांचे ठरविण्यात आले आहे. समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या वाऱ्यांमुळे लोखंडी भाग लवकर खराब होतो, अशा प्रकारच्या काही कारणांमुळे तिथे पुणेपेक्षा रिक्षांचे आयुष्य पाच वर्षांनी कमी ठेवण्यात आले आहे. पुण्यातील वीस वर्षांपेक्षाही अधिक काळ चांगल्या अवस्थेत रिक्षा राहू शकते, असे कारण देत रिक्षा चालकांनी रिक्षा योग्य स्थितीत असेपर्यंत ती रस्त्यावर चालविण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी प्राधिकरणाने साफ फेटाळून लावली. मागणी मान्य होईल, या आशेवर बसलेल्या रिक्षा चालकांनी रिक्षा भंगारात काढण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला नव्हता. प्राधिकरणाने निर्णय स्पष्ट केल्यानंतर आता मात्र या रिक्षा भंगारात निघणार आहेत.
अशी असते रिक्षा भंगारात काढण्याची प्रक्रिया
रिक्षा वीस वर्षे धावल्यानंतर त्याच परमिटवर नवी रिक्षा चालविण्यासाठी जुनी रिक्षा भंगारात काढण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पूर्वी केवळ कागदोपत्री रिक्षा भंगारात काढल्याचे दाखविले जात होते. त्या प्रमाणपत्राच्या आधारे नवी रिक्षा परमिटवर चालविता येत होती. मात्र, जुन्या रिक्षा काही मालकांकडून भंगारात न काढता त्या आडमार्गावर प्रवाशांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जात होत्या. हा प्रकार थांबविण्यासाठी सध्या प्रत्यक्षात प्रादेशिक परिवहन कार्यालयात जुनी रिक्षा घेऊन जावी लागते. तेथे कटरच्या साहाय्याने रिक्षाचे तुकडे केले जातात. खरोखरच तुकडे झाले की नाही, हे पाहिल्यावरच संबंधित अधिकाऱ्याकडून त्याचे प्रमाणपत्र देण्यात येते.  
‘त्या’ भंगाराचे मिळतात चार हजारच
रिक्षा भंगारात काढण्यापूर्वीच संबंधित ठेकेदाराकडून रिक्षाच्या भंगाराची किंमत ठरविली जाते. त्यात भावतोल करायला रिक्षा मालकाला फारसा वाव नसतो. रिक्षा भंगारात काढण्यापूर्वी नियमानुसार कर किंवा इतर काही थकबाकी असेल, तर ती भरावी लागते. भंगारात काढण्याच्या वेळी रिक्षाचा विमाही असावा, ही अट आता शिथिल करण्यात आलेली आहे. मात्र, इतर रक्कम भरावी लागते. रिक्षाचे भंगार झाल्यानंतर मात्र मालकाच्या हातात चार हजारांपेक्षा जास्त रक्कम येत नाही, असे रिक्षा मालकांनी सांगितले.

Story img Loader