थर्ड पार्टी विम्याच्या प्रस्तावित दरवाढीच्या निर्णयाचा रिक्षा पंचायतीने तीव्र निषेध नोंदविला आहे. या निर्णयावर फेरविचार न झाल्यास १ एप्रिलपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रिक्षाचे वार्षिक वैधता प्रमाणपत्र न घेण्याचा इशारा पंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.
देशव्यापी बंदला पाठिंबा देण्याबरोबरच रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांबाबत पंचायतीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, निमंत्रक नितीन पवार, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या अनुराधा आठले, राज्य कर्मचारी संघटनेचे नारायणराव जोशी, हमाल पंचायतीचे नवनाथ बिनवडे आदी त्या वेळी उपस्थित होते.
थर्ड पार्टी विम्यामध्ये पुन्हा ३०० ते ४०० रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव विमा प्राधिकरणाने मांडला आहे. कमी जोखीम कमी हप्ता, जास्त जोखीम जास्त हप्ता या विम्याच्या मूलभूत तत्त्वाच्या विपरीत हा प्रस्ताव आहे. रिक्षाचे अपघात एक टक्काही होत नाहीत. त्यामुळे दाव्यांचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे विम्याचा हप्ता कमी होणे गरजेचे असताना विमा कंपन्या रिक्षा चालकांची लूट करीत असल्याचा आरोप पंचायतीच्या वतीने करण्यात आला. विमा कंपन्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतरही वाढ होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार न झाल्यास वैधता प्रमाणपत्र घेणार नसल्याचा इशारा नितीन पवार यांनी दिला. सीएनजीचा अपुरा पुरवठा व रिक्षाच्या भाडेवाढीच्या मागणीबाबतही या वेळी उपजिल्हाधिकारी रमेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.