तीन आसनी रिक्षांसाठी सीएनजीचा पुरवठा सुरळित न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा पंचायतीने दिला आहे.
सीएनजी मिळविण्यासाठी रिक्षाचालकांना रांगेत करावी लागणारी प्रतीक्षा वाढल्याच्या मुद्दय़ावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव आणि निमंत्रक नितीन पवार यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
या वेळी डॉ. आढाव म्हणाले, ‘‘सीएनजीचा पुरवठा करणारे पंप सुरू होण्याबाबत काही लोकप्रतिनिधींद्वारे केल्या जाणाऱ्या घोषणांमुळे रिक्षाचालकांच्या आशा क्षणिक पल्लवित होतात, पण रोजची रांग आणि वेळेचा अपव्यय चुकत नाही. रिक्षा पंचायतीने याबाबत सतत पाठपुरावा करूनही नवीन सीएनजी पंप सुरू होण्यात अडथळे कायम आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने याबाबत खुलासा न केल्यास हे कार्यालय आम्हाला बंद करावे लागेल.’’
राज्य कृती समितीच्या २७ तारखेला होणाऱ्या बैठकीत सीएनजीचा पुरवठा आणि बेकायदा मोटार कॅब हे विषय प्रामुख्याने चर्चिले जातील असे पवार यांनी सांगितले. हे आंदोलन पुण्यात एप्रिलमध्ये होणार असून त्यात या विषयीच्या मागण्यांची शासनाकडे दाद मागितली जाईल, असेही पवार म्हणाले.