प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संगणकावरील पासवर्ड चोरून मुख्यमंत्र्यांच्या नावाने रिक्षाचा परवाना दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रणाली प्रशासक सुधीर दिनकर बाडेस (वय ५६, रा. सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी भरत कांबळे, डी. बी. थोरात आणि डी. बी. चव्हाण यांचे गोपनीय पासवर्ड चोरून अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (रा. शिवाजीनगर) यांच्या नावाने रिक्षा नोंदणी प्रमाणपत्र व परवाना तयार केला. वाहनाची खोटी नोंद करून शासनाची आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाची फसवणूक केली. याची चौकशी केल्यानंतर अज्ञात आरोपींच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक ए. डी. फुगे हे अधिक तपास करत आहेत.

Story img Loader