पुणे : वाढती किंमत आणि मागणीत होत असलेली घट यामुळे देशभरात घरांच्या विक्रीत घसरण होत आहे. देशात गेल्या वर्षी घरांची विक्री ४ टक्क्यांनी कमी झाली आहे. पुण्याचा विचार करता घरांची विक्री ६ टक्क्यांनी घटली असून, किमतीत मात्र १४ टक्के वाढ झाली आहे.
देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल अनारॉक ग्रुपने जाहीर केला आहे. या अहवालानुसार, किमतीत सातत्याने होत असलेली वाढ आणि गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकांमुळे घरांच्या विक्रीत घट झाली आहे. देशातील ७ प्रमुख शहरांत गेल्या वर्षी ४ लाख ५९ हजार ६५० घरांची विक्री झाली. त्याआधीच्या वर्षात २०२३ मध्ये घरांची विक्री ४ लाख ७६ हजार ५३० होती. गेल्या वर्षी २०२३ च्या तुलनेत विक्रीत ४ टक्के घट झाली आहे. घरांच्या विक्रीची एकूण उलाढाल मात्र गेल्या वर्षी वाढली. ही उलाढाल २०२३ मध्ये ४.८८ लाख कोटी रुपये होती आणि २०२४ मध्ये ती १६ टक्क्यांनी वाढून ५.६८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
पुण्यात २०२३ मध्ये ८६ हजार ६८० घरांची विक्री झाली होती. गेल्या वर्षी त्यात ६ टक्के घट होऊन ८१ हजार ९० घरांची विक्री झाली आहे. पुण्यात २०२३ मध्ये ८३ हजार ६२५ नवीन घरांचा पुरवठा झाला होता. गेल्या वर्षी त्यात तब्बल २८ टक्के घट झाली असून, ६० हजार ५४० नवीन घरांचा पुरवठा झाला. पुण्यात घरांची सरासरी किंमत २०२३ मध्ये प्रतिचौरस फूट ६ हजार ७५० रुपये होती. गेल्या वर्षी त्यात १४ टक्के वाढ झाली असून, ती ७ हजार ७२० रुपयांवर पोहोचली, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पुण्यातील घरांची बाजारपेठ
वर्ष | घरांची विक्री | नवीन पुरवठा | प्रतिचौरस फूट किंमत (रुपयांत) |
२०२३ | ८६,६८० | ८३,६२५ | ६,७५० |
२०२४ | ८१,०९० | ६०,५४० | ७,७२० |
हे ही वाचा… पुण्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाला धक्का, पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर
देशात घरांच्या किमतीत २०२३च्या तुलनेत गेल्या वर्षी २१ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. चालू वर्षी किमतीमध्ये एवढी वाढ दिसून येणार नाही. घरांच्या किमती आगामी काळात स्थिरावताना दिसतील. याचबरोबर घरांच्या मागणीतही वाढ होईल.- अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप
गेल्या काही वर्षांत घरांच्या विक्रीत सातत्याने वाढ झाली होती. यंदा घरांच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांकडून मागणी कमी होत आहे. परवडणारी घरे नसल्याने ग्राहक खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकत आहेत. त्यामुळे घरांची चौकशी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही कमी झाली आहे. पुढील वर्षी घरांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढून गृहनिर्माण क्षेत्रात घसरण होण्याचीही शक्यता आहे. – रोहित गेरा, व्यवस्थापकीय संचालक, गेरा डेव्हलपमेंट्स