पिंपरी : उन्हाचा कडाका वाढल्याने पाण्याची मागणीही वाढली असताना विस्कळीत, अपुरा, अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. मागील दोन महिन्यांत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत एक हजार ८१० तक्रारी महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर आल्या आहेत. यामधील एक हजार १४३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, ६६७ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात २५ नाेव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. दाेन दिवसांतून एकच वेळेस पाणी मिळते. अनियमित, अपुरा आणि कमी दाबाने पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी टॅंकरद्वारे तहान भागवावी लागत आहे.

शहराला सध्या पवना धरणातून ५२०, आंद्रातून ८०, तर एमआयडीसीकडून २० असे ६२० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा केला जाताे. त्यानंतरही उद्योगनगरीतील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. एक मार्च ते २८ एप्रिल या दाेन महिन्यांच्या कालावधीत महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर अपुरा, कमी दाबाने, पाणी आले नाही, अशा एक हजार ८१० तक्रारी आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ३९० तक्रारी ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयामधून, तर सर्वांत कमी ‘अ’ प्रभागातून ८९ तक्रारी आल्या आहेत.

पवना धरणात ३५ टक्के पाणीसाठा

शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात ३५.८० टक्के पाणीसाठा आहे. हा साठा जूनअखेरपर्यंत पुरेल इतका आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढू लागली आहे. धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. दुसरीकडे धरणातून काही प्रमाणात पाणीगळतीही हाेत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी केले आहे.

धरणातील सध्याचा पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरेल इतका आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा. पाण्याचा अपव्यय करू नये, पिण्याचे पाणी पिण्यासाठीच वापरावे. महापालिकेच्या नळास थेट विद्युत पंप लावून पाणी घेणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत २५० पेक्षा अधिक पंप जप्त करण्यात आले असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.