इंदापूर : राज्यात गुईलेन बॅरे रुग्णांची संख्या पुणे विभागांमध्ये जास्त आढळून येत असतानाच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये २१ रुग्ण या आजाराचे आढळून आले आहेत. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह सर्वत्रच पाण्याचे नमुने आणि चिकनच्या नमुन्याची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली असतानाच , पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चिकन सेंटर मधील कचरा, मृत कोंबड्यांचे पंख, पाय, आतड्याचा भाग असे घाण ,सडलेले , दुर्गंधीयुक्त अवशेषांच्या मोठ्या पिशव्या राजरोसपणे राष्ट्रीय महामार्गावरच टाकल्या जात आहेत . यामुळे या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या हजारो लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून याचा नाहक त्रास स्थानिक व परिसरातील हायवे लगतच्या शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणामध्ये सहन करावा लागत आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगत यापूर्वीही अनेक वेळा मृत जनावरांचे अवशेष कत्तलखान्यातली घाण, दुर्गंधी सुटलेले अवशेष आणून टाकण्याचे वारंवार प्रकार घडत आहेत. त्याबाबतची माहिती संबंधित स्थानिक पोलीस पाटील व प्रशासनाला वेळोवेळी नागरिक देत असताना यावर अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची उपाययोजना झालेली आढळून येत नाही.
सध्या राज्यामध्ये गुईलेन बॅरे या रुग्णांची संख्या वाढत असताना पुणे विभागांमध्ये मोठा आकडा दिसून येत आहे.त्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत असताना या आजाराच्या प्रादुर्भावाच्या कारणांचा शोध घेण्यामध्ये पाण्याची तपासणी व चिकनच्या नमुनेच्या तपासणीची मोहीम एकीकडे हाती घेतली जाते. व दुसरीकडे चिकनचे मोठ्या प्रमाणामध्ये अवशेष रस्त्यावर आणून फेकले जातात. याकडे आरोग्य खात्यासह राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे हे दुर्लक्ष होत आहे.
असे दुर्गंधीयुक्त प्राण्यांचे अवशेष अगदी मोक्याच्या ठिकाणी रातोरात टाकले जातात .या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून याचा शोध घ्यावा व कारवाई करावी अशी मागणी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून येणारे- जाणारे प्रवासी व स्थानिक लोकांकडून होत आहे. मृत प्राण्यांचे अवशेष टाकल्याने त्या ठिकाणी मोकाट कुत्री दिवसभर व रात्रभर फिरत असतात दुर्गंधीयुक्त पदार्थ इकडे तिकडे करत असतात त्याचा फार मोठा त्रास लोकांना सहन करावा लागत असून त्यांच्या आरोग्यास हानिकारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
चिकनच्या सडलेल्या या दुर्गंधीयुक्त अवशेषांमुळे अहोरात्र भटकी कुत्री त्याठिकाणी फिरत असतात त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना अपघात होण्याचा संभव निर्माण झाला आहे.