पुणे : जीवनशैलीतील बदलांमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. हृयविकाराच्या रुग्णांसाठी संभाव्य धोका टाळण्यासाठी आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक ठरते. अशा रुग्णांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल उपचारपद्धतीचा प्रभावीपणे वापर करण्यास सुरुवात झाली आहे. यात रुग्णाच्या रक्तदाबापासून रक्तशर्करेपर्यंतच्या महत्त्वाच्या घटकांवर लक्ष ठेवून त्यांना आधीच धोक्याची सूचना देण्याचा प्रयोग डिजिटल माध्यमातून केला जात आहे.
लुपिन डिजिटलने हेल्थने हृदयविकाराच्या रुग्णांसाठी लाइफ ही डिजिटल उपचारपद्धती सुरू केली आहे. ही उपचारपद्धती अशा रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याच्या हेतूने बनविण्यात आली आहे. लुपिनने देशात पुण्यासह २५० शहरांमध्ये ही सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. त्यात ४५० हृदयविकारतज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. शहरांसोबत ग्रामीण भागातही अनेक रुग्ण या उपचार पद्धतीचा अवलंब करीत आहेत, अशी माहिती लुपिनचे व्यवसाय विकासप्रमुख राजेश खन्ना यांनी दिली.
रुग्णाला हृदयविकारतज्ज्ञांकडून या डिजिटल उपचारपद्धतीची माहिती दिली जाते. रुग्णाने ही उपचारपद्धती स्वीकारल्यानंतर त्याला रक्तदाब, रक्तशर्करा, ऑक्सिजन पातळी, व्यायाम, ईसीजी आणि वजन आदींचे मापन करणारी छोटी यंत्रे दिली जातात. ही यंत्रे मोबाइल उपयोजनाशी जोडलेली असतात. रुग्णाच्या प्रत्येक महत्त्वाच्या घटकांमध्ये होणारे बदल मोबाइल उपयोजनाच्या माध्यमातून हृदयविकारतज्ज्ञांना दिसत असतात. त्यात अचानक मोठे बदल होऊ लागल्यास तातडीने रुग्णाला नजीकच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा संभाव्य धोका टळतो, असेही खन्ना यांनी सांगितले.
हेही वाचा : Health Special: थंडीमध्ये सकाळी लवकर अन्नसेवन का करावे?
रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी
लुपिनने याबाबत एक संशोधन केले आहे. त्यात ३० रुग्णांचा ९० दिवस अभ्यास करण्यात आला. रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून त्यांना वेळोवेळी संभाव्य धोका टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. औषधोपचार, आहार आणि व्यायामाबाबतच्या सूचनांचे पालन करणाऱ्या ९० टक्के रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. याचबरोबर ८३.३ टक्के रुग्णांनी त्यांचा रक्तदाब, रक्तशर्करा, वजन आदी बाबी नियंत्रणात ठेवल्या आणि त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली नाही, असेही खन्ना यांनी नमूद केले.