पुणे : क्रिकेट खेळता-खेळता एका तरुणाला छातीत जळजळ होऊ लागली. डॉक्टरांनी तातडीने हृदयविकाराच्या चाचण्या करण्याचा सल्ला दिला. त्याच्या चाचण्यांमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. अशी अनेक उदाहरणे आता वारंवार दिसून येऊ लागली आहेत. तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला असून, वेळीच काळजी घेण्याचा सल्ला हृदयविकार तज्ज्ञांनी दिला आहे.
जागतिक हृदय दिन २९ सप्टेंबरला साजरा केला जातो. या निमित्ताने तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढलेल्या धोक्याबाबत तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. अनेकवेळा छातीत जळजळ अथवा दुखू लागल्यास पित्तामुळे असेल, असा समज करून घेतला जातो. त्यातून पित्तावरील गोळ्या घेऊन तात्पुरते उपाय केले जातात. प्रत्यक्षात नेमका आजार काय आहे, याची तपासणी केली जात नाही. हा हृदयविकार असल्यास तो वाढत जातो आणि त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते. त्यामुळे किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर दरवर्षी आरोग्य तपासणी करण्यावरही तज्ज्ञांनी भर दिला आहे.
आणखी वाचा-मेट्रो मार्गाच्या उद्घाटनानिमित्त महायुतीचे आज शक्तिप्रदर्शन
याबाबत बाणेरमधील मणिपाल हॉस्पिटलमधील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अभिजीत जोशी यांनी त्यांच्याकडे आलेल्या रुग्णाचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनीत सल्लागार म्हणून काम करणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीला अचानक वातानुकूलित खोलीत घाम येण्यास सुरुवात झाली. त्याने थोडा वेळ दुर्लक्ष केले परंतु, त्रास कमी होत नाही म्हटल्यावर नेहमीच्या सवयीने जवळ असलेली पित्ताची गोळी घेतली. त्यानंतरही त्रास कमी न होता, आणखी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने तातडीने नजीकचे रुग्णालय गाठले. तेथे केलेल्या तपासणीत हृदयविकाराचा झटका येत असल्याचे निदान झाले. वेळीच निदान आणि उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला आणि हृदयाच्या पेशींना होणारी इजाही टळली.
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. राजीव सेठी म्हणाले की, पूर्वी वयोवृद्धांशी संबंधित असलेला हृदयविकाराचा धोका आता २०, ३० आणि ४० वर्षे वयोगटातही वाढत आहे. तरुणांमधील निष्क्रिय जीवनशैली, जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले अन्न, साखर आणि चरबीयुक्त पदार्थांचा आहार ही कारणे यामागे आहेत. तरुणांमध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या समस्यांचा धोका वाढत आहे. मद्यसेवन, धूम्रपान आणि मानसिक ताण यासारखे घटक तरुणांमध्ये हृदयरोगाच्या धोक्यात अधिक भर टाकत आहेत. हृदयविकाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि वेळेवर उपचार न घेतल्यामुळे तरुणांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढत आहे.
आणखी वाचा-संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर ११ जणांकडून लैंगिक अत्याचार
हृदयविकाराची लक्षणे वेळीच ओळखा…
- थोडे चालल्यावर अथवा एखादा जिना चढला तरी धाप लागणे.
- छाती जड होणे, छातीत दुखत असताना अस्वस्थ वाटणे.
- थोडे चालले किंवा अचानकपणे अस्वस्थ वाटून जास्त प्रमाणात घाम येणे.
- अचानक हृदयाचे ठोके आणि रक्तदाबात वाढ अथवा घट होणे.
- अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडणे.