शहरातील फेरीवाल्यांचे पुनर्वसन नदीपात्रात करण्याबाबत महापालिका प्रशासन विचार करत असून अशा प्रकारे फेरीवाल्यांना नदीपात्रात जागा देण्यास राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी विरोध केला आहे. फेरीवाले व विक्रेत्यांना नदीपात्रात जागा देणे योग्य ठरणार नाही, असे पत्र त्यांनी मंगळवारी महापौर आणि आयुक्तांना दिले.
शहरात गेले दोन आठवडे रस्त्यावरील विक्रेते, स्टॉल व विविध प्रकारच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे फेरीवाले, पथारीवाले यांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न चर्चेत आला आहे. व्यावसायिकांच्या संघटनांनी पुनर्वसनाची मागणी केली असून त्या दृष्टीनेही महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. रस्त्यावरील व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्या दृष्टीने जागांची पाहणी सुरू करण्यात आली असून मोकळे रस्ते व मोकळ्या जागांचा शोध घेऊन तेथे पथारीवाल्यांचे पुनर्वसन करण्याबरोबरच नदीपात्राचीही पाहणी पुनर्वसनासाठी करण्यात आली आहे.
अशाप्रकारे नदीपात्रात जागा द्यायला विरोध असल्याचे वंदना चव्हाण यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे. नदीपात्राच्या जागेत फेरीवाल्यांना जागा देणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असून फेरीवाल्यांचे प्रश्न अशा प्रकारे सोडवणे हे देखील चुकीचे असल्याचे खासदार चव्हाण यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. नदीपात्राची जागा मोकळी ठेवणे पर्यावरणाच्या व शहराच्या हिताचे आहे. फेरीवाल्यांना नदीपात्रात जागा देणे हे फेरीवाले व नागरिकांच्या दृष्टीनेही योग्य ठरणार नाही. तसेच फेरीवाल्यांना व्यवसायासाठीही ही जागा योग्य ठरणार नाही. नदीच्या वहनक्षमतेला अडचण होईल असे कोणतेही काम नदीपात्रात करता कामा नये, असेही खासदार चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader