लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये पथ आणि वाहतूक नियोजन या विभागांना सर्वाधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या दोन्ही विभागांना मिळून अंदाजपत्रकामध्ये २ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे पुढील काळात रस्त्यांची आणि वाहतुकीची कामे मार्गी लागून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले. १२ हजार ६१८ कोटी रुपयांच्या या अंदाजपत्रकात सर्वाधिक निधी हा पथ आणि वाहतूक नियोजन विभागासाठी देण्यात आला आहे.
शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मागील वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये विकास आराखड्यातील ३३ मिसिंग लिंकचे रस्ते विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यापैकी प्रत्यक्षात ३ मिसिंग लिंकची कामे सुरू करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते तयार करणे आवश्यक असून, त्यासाठी जागा ताब्यात घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी अंदाजपत्रकात हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने शहरातील सर्वांत अधिक वाहतूक असलेले ३३ मुख्य रस्ते निश्चित केले आहेत. यासाठी पहिल्या टप्प्यात १५ रस्त्यांची कामे करण्यात आली असून, उर्वरित १८ रस्त्यांच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. या रस्त्यांवरील वाहतूक सुधारण्यासाठी रस्ता रुंदीकरण, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना, दिशादर्शक फलक, दुभाजकांची रंगरंगोटी ही कामे केली जाणार आहेत.
महत्त्वाचे रस्ते, उड्डाणपूल, ग्रेड सेप्रेटर ही कामे सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित केली जाणार आहेत. यामध्ये बाणेर, कोंढवा, महमंदवाडी, कोंढवा या भागातील कामांचा समावेश आहे. शहरातील १९ कामे या पद्धतीने सुरू असून, त्यामध्ये गंगाधाम चौकातील बिबवेवाडी येथील उड्डाणपूल, खराडी येथील नदीवरील पुलाचा समावेश आहे.
सिंहगड रस्त्यावरील दोन्ही पूल मे आणि जुलै अखेरपर्यंत सुरू
सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, तो वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. विठ्ठलवाडी ते फनटाईम चित्रपटगृह आणि इंडियन ह्यूम पाईप कंपनी गेट ते इमानदार चौक या दरम्यान उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. फनटाईम चित्रपटगृह ते इनामदार चौकाकडे येणारा मार्ग मे २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच, सनसिटी ते कर्वेनगर या दरम्यान नदीवर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम जुलै २०२५ अखेरपर्यंत पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यामुळे सिंहगड रस्त्यावरील कोंडी सुटणार आहे.
मेट्रोसाठी ४०, तर नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी २७० कोटी
शहरात दोन मार्गावर मेट्रो धावत असून, त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गचा डीपीआर मान्यतेसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मेट्रो प्रकल्पासाठी जागा महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिली जाते. याासाठी अंदाजपत्रकात ४० कोटींचा निधी ठेवण्यात आला आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी २७० कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. यामध्ये नदीकाठ विकसित करणे, पीपीपी तत्त्वावर क्रेडिट नोटच्या मोबदल्यात नदीकाठचा रस्ता विकसित करणे यांचा समावेश आहे. नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठीही अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.