पुणे: शहरातील वेगवेगळ्या भागात रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, मलनिस्सारण वाहिनीचे कामे सुरू आहेत. महापालिकेच्या ठेकेदारांकडून ही कामे करण्यात येत असून, संबंधित कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करावीत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे न केल्यास ठेकेदारांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिला आहे.

शहर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या भागात रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, तसेच मलनिस्सारण वाहिनीची कामे सुरू आहेत. भूमिगत गॅस वाहिनीचे काम काही भागात सुरू आहे. महापालिकेने संबंधित कामे ठेकेदारांना दिली आहेत. ठेकेदारांनी ही कामे वेळेत करणे गरजेचे आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यात शहरातील वेगवेगळ्या भागात खोदकामामुळे ५० ठिकाणी कोंडी झाल्याचे वाहतूक शाखेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.
याबाबत शहरातील वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

खोदकाम सुरू असल्याने योग्य पद्धतीने वाहतूक नियोजन झाले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. ही बाब गंभीर आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करावीत. रस्ते पु्न्हा सुस्थितीत करण्यात यावेत. ३१ मे पूर्वी ही कामे पूर्ण न झाल्यास ठेकेदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याबाबत वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना नोटीस बजावून कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना द्यावी, असे पोलीस उपायुक्त झेंडे यांनी नमूद केले.

खोदकामामुळे झालेली कोंडी

जानेवारी – १३

फेब्रुवारी – २५

मार्च – १२