शहरात वाढत असलेली वाहने आणि त्यामुळे चौकात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन शहरातील सर्व सिग्नल हे आता सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मुख्य २१ रस्त्यांवरील ९७ स्वयंचलित वाहतूक सिग्नल हे सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत सुरू ठेवण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी मंगळवारी दिली.
शहरातील सिग्नलच्या वेळेत अनियमितता होती. रस्त्यावरील गर्दीनुसार सकाळी सात वाजल्यापासून ते नऊ पर्यंतच्या दरम्यान ते सुरू होत असत.  मात्र, शहरातील वाहनांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे चौकांमध्ये वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सिग्नल सकाळी लवकर सुरू करावेत, अशी मागणी होत होती. त्याचबरोबर शहरातील सर्व सिग्नल हे सकाळी सात वाजल्यापासून सुरू होतात ही एक वेळ नागरिकांना समजेल. त्यानुसार त्यांची मानसिकता बनेल, या हेतूने वेळेत बदल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
शहरात २८२ सिग्नल असून सध्या गर्दीच्या मुख्य रस्त्यावरील ९७ सिग्नल सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील टप्प्यात शहरातील सर्व सिग्नल सकाळी सातपासून सुरू करण्यात येणार आहेत. नागरिकांनी चौकात वाहतूक पोलीस नसले, तरी स्वयंशिस्तीने सिग्नलचे पालन करून अपघात व वाहतूक कोंडी टाळावी, असेही आवाहन पांढरे यांनी केले आहे.
सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत सिग्नल सुरू राहणारे रस्ते व चौक खालील प्रमाणे :-
टिळक चौक ते जेधे चौक (टिळक रस्ता), जेधे चौक ते गोळीबार मैदान (शंकरशेठ रस्ता), जेधे चौक ते अहिल्यादेवी चौक (सातारा रस्ता), खंडोजीबाबा चौक ते कर्वे पुतळा (कर्वे रस्ता), गोखले स्मारक चौक ते वीर चाफेकर चौक (फग्युर्सन रस्ता), संचेती चौक ते नटराज चौक (जंगली महाराज रस्ता), सिमला ऑफिस चौक ते विद्यापीठ चौक (गणेशखिंड रस्ता), महात्मा गांधी उद्यान चौक ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चौक (राजा बहादूर रस्ता), मंगलदास चौक ते ब्ल्यू नाईल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, कुंभारवेस चौक, खुडे चौक-वीर सावरकर भवन चौक, सेनापती बापट रस्त्यावरील सर्व चौक, सावरकर चौक ते वडगावपूल (सिंहगड रस्ता), मम्मादेवी चौक ते हडपसर गाडीतळ (सोलापूर रस्ता), बाणेर रस्त्यावरील सर्व चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौक ते बोपोडी चौक (पुणे-मुंबई रस्ता), महात्मा गांधी चौक ते ब्ल्यू डायमंड चौक, चंद्रमा चौक, सादलबाबा चौक, तारकेश्वर चौक, पर्णकुटी चौक, शास्त्री रस्त्यावरील सर्व चौक, लुल्लानगर चौक, गंगाधाम चौक, चंद्रलोक हॉस्पिटल चौक, साठे चौक, महेश सोसायटी चौक आणि सीएमई गेट ते भक्ती शक्ती चौक (पुणे-मुंबई रस्ता).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा