दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन सव्‍‌र्हेक्षण करणार

िपपरी-चिंचवड शहरातील अंतर्गत वाहतूक सुलभ व सुरक्षित व्हावी, यासाठी महापालिकेच्या विकास आराखडय़ामध्ये २९ किलोमीटर लांब व ३० मीटर रुंदीचा वर्तुळाकार मार्ग आरक्षित केला. मात्र, अनेक वर्षांपासून तो कागदावरच राहिला. बऱ्याच उशिरा का होईना महापालिकेने भविष्यातील वाहतुकीचा विचार करून या उच्च क्षमता वाहतूक मार्गाची (एचसीएमटीआर) प्रक्रिया नव्याने सुरू केली आहे. दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन (डीएमआरसीएल) कंपनीची सल्लागार कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना या संदर्भातील सर्व आवश्यक बाबींचे सव्‍‌र्हेक्षण करण्याचे काम देण्यात येणार आहे. सात महिने मुदतीच्या या कामासाठी दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

निगडी प्राधिकरणातील वाल्हेकरवाडीपासून हा प्रस्तावित वर्तुळाकार रस्ता सुरू होतो. भेळ चौक, भक्ती-शक्ती, सेक्टर २२, यमुनानगर, चिखली, नाशिक रस्ता अशा मार्गाने तो नाशिक फाटा उड्डाणपुलापासून पुढे िपपळे सौदागरकडे जातो. या मार्गासाठी विविध टापूत जवळपास ६० टक्के जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. काही जागा तर २५ वर्षांपूर्वीच्या आहेत. आतापर्यंत याबाबतचा विचार होत नव्हता म्हणून हा प्रस्ताव कागदावरच होता. मात्र, वाढत्या वाहतूक समस्यांचा विचार करून या मार्गाची  प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर ट्राम, बीआरटी, मोनोरेल, लाईट रेल, मेट्रो आदींपैकी कोणत्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी सुरू करायची, याबाबत धोरण ठरलेले नाही. राजकीय पातळीवरही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे सर्वप्रथम सल्लागार कंपनीची नियुक्ती करून याबाबतचे सव्‍‌र्हेक्षण करण्याचा पर्याय पालिकेने निवडला आहे. वाहतुकीचे येत्या किमान १५ वर्षांचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून आणि कोणत्या वाहतूक व्यवस्थेची निवड करायची, याचे सव्‍‌र्हेक्षण होणार आहे. त्यासाठी कंपनीला एक कोटी ४५ लाख रुपये दिले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला, तेव्हा समिती सदस्यांनी ‘अभ्यास’ करण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. पुढील बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे.

मोशीत आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र प्रस्तावित आहे. चाकणला विमानतळ होतो आहे. दररोज वाहनसंख्येत भर पडते आहे. शहरातील वाहतूक येत्या काळात बरीच वाढणार आहे. त्यादृष्टीने वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा महापालिकेचा विचार आहे. या क्षेत्रातील अनुभवी दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनला सव्‍‌र्हेक्षणाचे काम देण्याचा प्रस्ताव आहे.

– राजन पाटील, सहशहर अभियंता

Story img Loader